संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करत असताना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. यूपीएचं नाव ऐकून लोकांच्या मनात स्कॅम, घोटाळे आणि भ्रष्टाचार आठवतात. त्यामुळे त्यांनी आपल्या आघाडीचं नाव ‘इंडिया’असं केलं आहे. विरोधी पक्षाने २०१८ मध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार निवडून आलं होतं. आताही २०२४ मध्ये प्रचंड मताधिक्याने एनडीए सरकार निवडून येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
अविश्वास प्रस्तावावर भाष्य करताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये म्हटलं होतं की, विरोधी पक्ष २०२३ मध्ये माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणेल. आज तसंच होत आहे. २०१८ मध्ये विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर २०१९ मध्ये २०१४ पेक्षा अधिक खासदार एनडीएचे निवडून आले होते. आताही विरोधी पक्षाकडून पुन्हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे २०२४ मध्ये एनडीएची संख्या ४०० पार जाईल.”
हेही वाचा- “मी कोणत्याही बाजुची नाही, तर…”, खासदार नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?
“आज संसदेतील चर्चा अविश्वासाची नाही. तर ही चर्चा अविश्वासाविरोधात जनविश्वासाची आहे. जनविश्वास हा एनडीए आणि नरेंद्र मोदींच्या बाजुने आहे. लोकांनी दोनवेळा २०१४ आणि २०१९ मध्ये विरोधी पक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. २०२४ मध्ये जनता हॅट्ट्रीक करायला जात आहे,” असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षाला उद्देशून श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, “यांनी आपलं नाव एनडीए बदलून ‘इंडिया’ केलं आहे. त्यांना वाटतं की, त्यांच्या आघाडीचं नाव बदलून ‘इंडिया’ ठेवल्याने भारताचे लोक यांच्या बाजुने येतील. पण मी सांगू इच्छितो की, त्यांनी यूपीएचं नाव बदललं कारण त्यांना यूपीएची लाज वाटते. यूपीएचं नाव ऐकून लोकांच्या मनात स्कॅम, घोटाळे आणि भ्रष्टाचार आठवतात. २ जी घोटाळा, ऑगस्टा घोटाळा, दहशतवादी हल्ले, रिमोट कन्ट्रोलवाली सरकार आठवते. त्यामुळेच २०१४ मध्ये लोकांनी काँग्रेसची साथ सोडून मोदींच्या हातात देशाची सूत्रं दिली. आज ते म्हणतायत की, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोल राहा हू’. पण मला वाटतं की, एका व्यक्तीच्या विरोधात हे सगळे लोक एकत्र येत आहेत. यांचा कोणताही नेता नाही. यांची कोणतीही नीयत नाही. त्यांची कोणतीही नीती नाही, अशी ही आघाडी आहे.”