‘खरी शिवसेना कोण’ यावरुन ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. सुप्रीम कोर्टानंतर ही लढाई निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र पक्षचिन्ह आणि नावावरुन ही लढाई सुरु असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याची माहिती मिळत आहे. आयागोसमोर आपली बाजू भक्कपणे मांडण्यासाठी ठाकरे गटाने तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली होती. दरम्यान ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे.
निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य करा!; शरद पवारांचे आवाहन
“ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले”; नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप!
शिंदे गटाकडून वारंवार आपणच खरी शिवेसना असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा खोडून काढण्यासाठी ठाकरे गटाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रं जमा करण्यास सुरुवात केली होती. दोन ट्रक भरुन हे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले होते. पण निवडणूक आयोगाने यामधील अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद ठरवली आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरु शकतो.
बाद ठरवण्याचं कारण काय?
ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्येच ही प्रतिज्ञापत्रं देणं अपेक्षित होतं. नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली आहेत. दरम्यान उर्वरित साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रं स्वीकारण्यात आल्याचं समजत आहे.
आमच्याकडे कोणतीही माहिती नाही – वकील
निवडणूक आयोगाने आपल्याला यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याचं ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं आहे. ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी आपण आयोगाने दिलेल्या फॉरमॅटनुसारच प्रतिज्ञापत्रं दिली असून, हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
फडणवीसांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं. “निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचं कोणतंही प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता देणं किंवा चिन्ह देणं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, कुणाचे रद्द झालेत, कुणाचे टिकले हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाने गोठवलं पक्षचिन्ह आणि नाव
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केलं होतं. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली. ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ निशाणी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने अद्याप आपला अंतिम निर्णय दिलेला नाही. दोन्ही बाजू पडताळून पाहिल्यानंतर आयोग आपला निर्णय देणार आहे. त्यानंतरच ‘खऱी शिवसेना कोण’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार? या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे.