निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह दिलं आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर पक्षचिन्हासाठी तीन पर्याय दिले होते. यामध्ये ‘तळपता सूर्य’, ‘ढाल-तलवार’ आणि ‘पिंपळाचं झाड’ यांचा समावेश होता. शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्ह पहिली पसंती होती. पण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला हे चिन्ह देण्यास नकार दिला. यामागील कारणही निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाने काय सांगितलं?

“नुसता सूर्य आणि उगवता सूर्य ही दोन्ही चिन्हं आधीच इतर पक्षांना देण्यात आली आहेत. फक्त गोलाकार, कोणतीही किरणं नसणारा सूर्य झोराम नॅशनलिस्ट पक्षाला देण्यात आला आहे. तसंच उगवता सूर्य डीएमके पक्षाला देण्यात आला आहे. तुम्ही मागणी केलेलं चिन्ह यांच्याशी मिळतं जुळतं आहे. तुमच्या चिन्हामुळे संभ्रम वाढेल. यामुळे तळपता सूर्य चिन्ह आम्ही नाकारत आहोत,” असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले “भविष्यात…”

“तुम्ही दिलेलं चिन्ह सफरचंद, फुटबॉल यांच्याशीही मिळतं जुळतं आहे. त्यामुळेही संभ्रम निर्माण होऊ शकतो,” असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

‘ढाल-तलवार’ चिन्ह कसं मिळालं?

ढाल-तलवार चिन्ह याआधी पिपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंट या पक्षाला मिळालं होतं. २००० मध्ये या पक्षाची नोंदणी रद्द झाली. त्यानंतर २०१६ मध्ये हा पक्ष निवडणूक आयागोच्या यादीतूनही काढण्यात आला. त्यामुळे हे चिन्हं खुल्या यादीत होतं. त्याच आधारे शिंदे गटाची दुसरी पसंती असणारं हे चिन्ह त्यांना देण्यात आलं.

Shinde vs Thackeray: ‘धगधगती मशाल’ पक्षचिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मशालीचे धोके…”

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने हे पर्याय फेटाळून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चिन्हांचे नवे तीन पर्याय देण्याचा आदेश शिंदे गटाला दिला होता.

उद्धव ठाकरेंना ‘धगधगती मशाल’

उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या पक्षाच्या नावाासठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde vs thackeray election commission party symbol shinde faction shield sword sun flaming torch sgy
Show comments