बँकॉक : थायलंडच्या आखातात जहाजाला लागलेल्या भीषण आगीपासून वाचण्यासाठी घाबरलेल्या प्रवाशांनी समुद्रात उडय़ा मारल्या. गुरुवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेतील सर्व १०८ जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.सुरत थानी प्रांतातून निघालेली फेरी बोट थायलंडच्या किनारपट्टीवरील कोह ताओ या लोकप्रिय पर्यटन स्थळी पोहोचणार होती, तेव्हा एका प्रवाशाने अचानक मोठा आवाज ऐकला आणि धुराचा वास आला.
त्यानंतर बोटीवरील प्रवाशांनी धूर आणि आग पाहिली. प्रवाशांनी आरडाओरडा केला आणि अलार्म वाजवणे सुरू केले. त्यामुळे एकच गोंधळ माजला आणि सर्वानीच समुद्रात उडय़ा घेतल्या. बोटीतील बसलेल्या १०८ जणांपैकी ९७ प्रवासी होते. सर्वाना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जहाजाच्या इंजिनामध्ये आग लागली होती. यामागचे कारण तपासले जात आहे.