लोकसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजपखालोखाल जागा मिळूनही केंद्रीय मंत्रिमंडळात एकच, तेही अवजड उद्योग खाते मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेला बुधवारी पुन्हा एकदा केंद्रातील मोठय़ा भावासमोर नमते घ्यावे लागले. ‘आम्ही नाराज नव्हतोच, विस्तारात चांगले खाते मिळेल’ अशी सारवासारव करत शिवसेनेचे अनंत गीते यांनी अवजड उद्योग मंत्रालयाचा भार बुधवारी स्वीकारला.
केंद्रात एनडीए सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यापासूनच शिवसेनेच्या नेत्यांनी ‘आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे’ असा रेटा लावला होता. अठरा खासदारांच्या तुलनेत दोन कॅबिनेट, तर तीन राज्यमंत्रिपदे सेनेला हवी होती. मात्र मोदींनी कुणालाही न जुमानता कॅबिनेटमध्ये शिवसेनेला एकच मंत्रिपद, तेही अवजड उद्योग खाते दिले. त्यामुळे नाराज झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गीते यांना मंगळवारी पदाची सूत्रे न स्वीकारण्याचा ‘आदेश’ दिला. मात्र अरेरावी सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश मोदींनी दिल्याने ‘नवाझ शरीफ निमंत्रण’ प्रकरणापाठोपाठ दुसऱ्यांदा शिवसेनेला माघार घ्यावी लागली.
गीते यांनी बुधवारी कार्यभार स्वीकारला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चेवर उद्धव ठाकरे समाधानी आहेत. आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या वाटय़ाला अत्यंत महत्त्वाचे मंत्रालय येईल, असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा