मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील दुटप्पी धोरणाबाबत शिवसेना खासदारांमध्ये नाराजी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपने बोळवणच केली. मात्र, तरीही मंत्रिमंडळात पक्ष सहभागी झालाच. मग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळीच नसता स्वाभिमान का दाखविला, असा उद्विग्न सवाल शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी उपस्थित करत पक्षनेतृत्वावरच अप्रत्यक्ष टीका केली आहे. राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दुटप्पी धोरण अवलंबल्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी आहे.

अनेक खलबते, चर्चेच्या फेऱ्यांनंतर शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात दोन राज्यमंत्रिपदांवर समाधान मानले. मात्र, केंद्रातील मंत्रिपदाची संधी गेल्याने अनेक इच्छुकांना हळहळ करण्यापलीकडे काही उरले नाही. ‘राज्यात कॅबिनेट मंत्रिपदासाठी पक्ष अडून बसला होता. लाचार वगैरे होणार नसल्याची भाषाही केली जात होती. परंतु ऐनवेळी दोन राज्यमंत्रिपदांवर समाधान मानण्याचा निर्णय घेण्यात आला. मग अशीच लवचीक भूमिका केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत का घेतली गेली नाही. ताठरपणा सोडला असता तर कदाचित आमच्यापैकी एकाला तरी केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली असती. त्याचा अंतिमत फायदा पक्षालाच झाला असता, परंतु तसे झाले नाही’, अशा शब्दांत एका खासदाराने स्पष्ट नाराजी व्यक्त केली. स्वाभिमान फक्त केंद्रातच दाखवला गेल्याची उपहासात्मक टिप्पणीही या खासदाराने केली. अन्य खासदारांच्या भावनाही अशाच आहेत. परंतु नेतृत्वाच्या नाराजीच्या भीतीमुळे ते उघडपणे बोलण्याचे टाळत आहेत. एका खासदाराने तर सेनेच्या खासदारांची अवस्था ‘मुकी बिचारी कुणीही हाका’, अशी झाली असल्याचे स्पष्ट केले. ‘केंद्रातील मंत्रिपद कदाचित पक्षनेतृत्वालाच नको असावे, त्यामुळेच ते बेमालूमपणे भाजपवर खापर फोडून मोकळे झाले’, असा युक्तिवाद एका खासदाराने केला. तर मंत्रिपदासाठी पक्षातीलच तीव्र स्पर्धा हे स्वाभिमान दाखविण्याचे खरे कारण असू शकते, असा टोला एका खासदाराने हाणला.

केंद्रामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रिपद हवे असल्याचे सांगितले जात होते. मात्र भाजपने फक्त एक राज्यमंत्रिपद देऊ  केल्याने शिवसेना केंद्रीय विस्तारात सहभागी झाली नाही.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा किंवा अर्थमंत्री अरुण जेटली आदी त्रिकुटापैकी एकाने साधा संपर्कही न साधल्याने शिवसेना नेतृत्वाचा तिळपापड झाला होता. त्यातून शिवसेना विस्तारात सहभागी झाली नाही; पण शपथविधी सोहळ्यावर बहिष्कारही घातला नाही. केंद्रातील शिवसेनेचे एकमेव प्रतिनिधी अवजड उद्योग खात्याचे मंत्री अनंत गीते शपथविधीला आवर्जून उपस्थित होते.

चर्चेतील.. पण निसटलेले

शिवसेनेत प्रभावशाली असलेले राज्यसभेतील अनिल देसाई,  आनंदराव अडसूळ, औरंगाबादचे चंद्रकांत खैरे, शिरुरचे शिवाजीराव आढळराव आणि नाशिकचे हेमंत गोडसे आदींच्या नावांची चर्चा मंत्रिपदासाठी सुरू होती. त्यात देसाईंचे नाव सर्वात आघाडीवर होते. देसाईंच्या हातून मंत्रिपद निसटण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील वेळी ‘शिवसेने’च्या सुरेश प्रभूंना भाजपने परस्परच कॅबिनेट मंत्री केल्याने शपथविधी घेण्यासाठी दिल्लीत पोचलेले अनिल देसाई विमानतळावरून मुंबईत परतले होते.

खासदारांची मतमतांतरे..

  • राज्याप्रमाणेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी ताठरपणा सोडला असता तर किमान एकाला तरी केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली असती
  • आम्हाला धड कुणी विचारत नाही, अन् सांगितले तरी कुणी ऐकत नाही
  • केंद्रातील मंत्रिपद बहुधा पक्षनेतृत्वालाच नको असेल
  • मोदी, शहा आणि जेटली यांपैकी कोणीही संपर्क न साधल्याने नेतृत्वाचा तिळपापड झाला

 

 

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena internal dispute on cabinet expansion