Shiv Sena Leader Shot Dead in Punjab : शिवसेना नेत्याची गुरूवारी गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात एक मुलगा देखील जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत्यू झालेले मंगत राय उर्फ मांगा हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मोगा जिल्ह्याचे अध्यक्ष होते अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली आहे.

५२ वर्षीय मंगत राय हे रात्री १० वाजण्याच्या सुमारास किराणा सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अचानक त्यांच्याव तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. मांगा यांच्यावर झाडलेली गोळी त्यांना न लागता जवळून जात असलेल्या एका १२ वर्षांच्या मुलाला लागली असेही पोलीसांनी सांगितले. त्यानंतर मांगा हे दुचाकीवरून घटना स्थळावरून पळून गेले, मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला.

पाठलाग करताना हल्लेखोरांना मंगत राय यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये त्यांना गोळी लागली. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. यानंचर मांगा यांना पोलिसांना रुग्णालयात दाखल केले जेथे त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. तर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी मोगा सरकारी रुग्णालयात आणि नंतर दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शिवसेना नेत्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, सहा आरोपी आणि काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हत्येमागील कारण काय?

ही हत्येची घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडली असू शकतो असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्यांचे कोणाशीही वैर नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान या हत्येनंतर काही संघटना आणि मृताच्या नातेवाईकांनी प्रताप चौक परिसरात निदर्शने करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी पंजाब सरकारविरोधात धोषणाबाजीही करण्यात आली.

शिवसेनेचे नेते मांगा यांच्या मुलीने पीटीआयशी बोलताना सांगितले की, तिचे वडील दूध आणण्यासाठी घरातून गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निघाले. रात्री अकरा वाजता आम्हाला कोणीतरी सांगितलं की माझ्या वडिलांची गोळी झाडून हत्या झाली आहे. आम्हाला न्याय हवा आहे आणि त्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते करू.