दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’त मराठी खासदारांना मिळणारी दुय्यम वागणूक आणि तेथील अनंत अडचणींविरोधात शिवसेना खासदारांनी गुरुवारी थेट निवासी आयुक्त विपीन मलिक यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मराठी खासदारांना सामान्य दर्जाची खोली, तर उत्तर प्रदेशमधील खासदार सत्यपाल सिंह यांना मंत्र्याचा दर्जा असलेला कक्ष देऊन ‘अमराठी बाणा’ जपणारे मलिक सेना खासदारांच्या भीतीमुळे दिवसभर स्वत:च्या कार्यालयाकडे फिरकलेदेखील नाहीत. संतप्त शिवसेना खासदारांनी मलिक यांच्या दालनात धडक मारून भिंतींवर शिवसेनेचा ‘संदेश’ लिहिला.
दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन म्हणजे अनंत अडचणींचे माहेरघर आहे. अमराठी पद्धतीचे, तेदेखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण, मराठी खासदारांना दुय्य्म वागणूक, अस्वच्छ स्वच्छतागृह असे चित्र आहे. यासारख्या अनंत तक्रारींचा जाब विचारण्यासाठी राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यासह अन्य १३ खासदार दुपारी महाराष्ट्र सदनात दाखल झाले. मलिक  त्या वेळी सदनात नव्हते. ते राज्याच्या मुख्य सचिवांना आणण्यासाठी विमानतळावर गेले होते. शिवसेना खासदारांनी अतिरिक्त निवासी आयुक्त समीर शाह यांना बोलावले. त्यांची खरडपट्टी काढणे सुरू असताना मुख्य सचिव सदनात दाखल झाले. सेना खासदारांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला.  रोषाचा सामना करावा लागेल या भीतीने मलिक यांनी सदनात येण्याचे टाळल्याचे समजताच शिवसेना खासदारांचा पारा अजूनच चढला व ते मलिक यांच्या कार्यालयात दाखल झाले. तेथे भिंतीवर ‘जय महाराष्ट्र’, ‘विपिन मलिक यांचा निषेध असो’ अशा घोषणा लिहून शिवसेना खासदारांनी आपला राग व्यक्त केला. सोमवापर्यंत महाराष्ट्र सदनाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनातील व्यवस्था अत्यंत वाईट आहे. मराठी खासदारांना छोटय़ा खोल्या, तर परराज्यातील खासदारांना मंत्र्यांसाठी राखीव असलेला कक्ष दिला जातो. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या वेळी अनिल देसाई, विनायक राऊत, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव आढळराव पाटील, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, राजन विचारे, हेमंत गोडसे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, रवी गायकवाड, प्रताप जाधव उपस्थित होते.    
विपिन मलिक स्वत:हून मराठी खासदार तर सोडा, सदनात येणाऱ्या कुणाही मराठी माणसाची साधी विचारपूसही करीत नाहीत. परंतु बागपतचे खासदार व माजी पोलीस अधिकारी सत्यपाल सिंह यांना स्वत:हून दूरध्वनी करून महाराष्ट्र सदनात येण्याची विनंती त्यांनी केली होती. या विनंतीमुळे ३१ मेपासून सत्यपाल सिंह महाराष्ट्रातील मंत्र्यांसाठी आरक्षित असलेल्या कक्षात तळ ठोकून आहेत. सत्यपाल सिंह यांच्यासाठी पायघडय़ा अंथरणाऱ्या मलिक यांनी मराठी खासदारांना मात्र छोटय़ा खोल्या दिल्या आहेत. कहर म्हणजे महाराष्ट्र सदनात मराठी चवीचे जेवण मिळत नाही. आषाढी एकादशीला साबुदाण्याची खिचडी न मिळाल्याने एका मराठी खासदाराने मलिक यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गुजरात, आंध्र प्रदेश, पंजाब भवन, आसाम भवन, उत्तराखंड भवनमध्ये स्थानिक चवीचे जेवण मिळते. महाराष्ट्र सदन त्याही बाबतीत बेचव आहे.

Story img Loader