नवी दिल्ली : शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली. ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

ठाकरे गटाच्या वतीने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

nagpur bhaskar jadhav
“लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
Yashwant Sena chief Madhav Gadde stated if CM Eknath Shinde ignores Dhangar demands then we don t need you either
ठाणे : यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा काढला
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Rajendra Patil Yadravkar DD Chaugule and Yogesh Rajhans were awarded Karmaveer awards
यड्रावकर, चौगुले, राजहंस यांना कर्मवीर पुरस्कार जाहीर
MLA sanjay gaikwad rahul gandhi should apologized to Babasaheb Ambedkar
बुलढाणा : “राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी, तरच…’ संजय गायकवाड यांनी सुचवला पर्याय
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Sitaram Yechury Raj Thackeray
Sitaram Yechury : राज ठाकरेंची सीताराम येचुरींसाठी पोस्ट; म्हणाले, “विचारसरणीवर श्रद्धा ठेवणारे फक्त कम्युनिस्टच उरलेत”

ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला वापरता येईल.  शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ तसेच, ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, ‘गदा’ या चिन्हालाही धार्मिक संदर्भ असल्याने आयोगाने हे चिन्ह नाकारले. धार्मिक संदर्भ असलेली चिन्हे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे म्हणून न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी, दुपारी एक वाजेपर्यंत पक्ष व चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते. मात्र, दोन्ही गटांकडून सादर झालेल्या नाव आणि चिन्हांमध्ये साधम्र्य असल्याचेही उघड झाले. त्यामुळे आयोगाकडून कोणता निर्णय घेतला जाईल, याकडे लक्ष लागले होते. अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर, शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे मूळ नाव व ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला.

ठाकरे गटाच्या वतीने पर्यायी पक्षनावे व चिन्हे जाहीर केली होती. मात्र, शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कोणते पर्याय सुचवले गेले, याबाबत सोमवारी दिवसभर या गटाच्या वतीने अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेले नव्हते. मात्र, शिंदे गटाने सुचवलेल्या पक्षांच्या नावाचे व चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाच्या पर्यायांप्रमाणेच असल्याचे सांगितले जात होते. शिंदे गटाने पक्षनावांसाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘शिवसेना बाळासाहेबांची’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगाला सादर केल्याचे सांगण्यात येते. ‘आम्ही पक्षनाव तसेच चिन्हांचे पर्याय सादर केल्यानंतर लगेच ही बाब सार्वत्रिक केली जात असून शह-काटशहचा खेळ केला जात आहे’, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला.

बाळासाहेब हे नाव कोणाचेही असू शकते -भास्कर जाधव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने पहिल्याच प्रयत्नात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिंकले आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. आमच्या पक्षाच्या नावात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचीही नावे आहेत. आम्ही चिन्हांबाबत जे तीन पर्याय दिले होते, त्यापैकी एक मिळाला आहे. म्हणून आम्ही आनंदी आहोत. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले आहे. पण बाळासाहेब हे नाव कोणाचेही असते, अशा शब्दांत जाधव यांनी शिंदे गटाला चिमटा काढला आहे. आमच्या नावात बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बाळासाहेबांच्या विचारांवर वाटचाल करणार-दीपक केसरकर

‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आनंद व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढील वाटचाल करणार आहोत. हिंदूत्वाचा विचार घेऊनच आम्ही काम करणार असून चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे मंगळवारी पर्याय दिले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच अंतिमत: धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

‘मशाल’ चिन्ह अन् भुजबळांचा विजय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर आधी १९८५ मध्ये शिवसेनेचे छगन भुजबळ हे एकमेव आमदार निवडून आले होते. तेव्हा शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष नसल्याने पक्षाच्या उमेदवारांना विविध चिन्हे निवडावी लागत होती. त्यानुसार भुजबळ यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते. शिवसेनेच्या वतीने निवडून आले तरी शिवसेना पक्ष नोंदणीकृत नसल्याने त्यांची गणना अपक्ष आमदार म्हणूनच होत असे.

शिंदे गटाला आज पक्षचिन्ह

शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने हे पर्याय फेटाळून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चिन्हांचे नवे तीन पर्याय देण्याचा आदेश शिंदे गटाला दिला आहे. त्यानुसार, शिंदे गटाने मुदतीत पर्याय सादर केल्यास या गटाला आज पक्षचिन्हाचे वाटप होऊ शकेल.

दिल्ली उच्च न्यायालयात धाव धन्युष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.