शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. एएनआयशी बोलताना राऊत म्हणाले, “गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. १८ जानेवारीला जागावाटपावर चर्चा होईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल १८ जानेवारीला गोव्यात जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करतील. फक्त त्यानंतर कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल.”
“महाराष्ट्र आणि गोव्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांची युती आहे. मात्र, या क्षणी काँग्रेसने राज्यात इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या युतीत काँग्रेस नसेल,” असे राऊत म्हणाले.
“योगीजींच्या गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. त्यांना त्यांच्या मूळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. अपर्णा यादव भाजपामध्ये जाणार असल्याचे मी ऐकले आहे. हे जाणून बरे वाटले,” असे राऊत म्हणाले.
आम्ही गोव्यात १०-१५ जागा लढवू, असं राऊतांनी सांगितलं. गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला होणार आहेत. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.