शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे’, अशा शब्दात महंत गिरी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आदी नेते अयोध्येत पोहोचले आहेत. शिवसेनेच्या दौऱ्यानिमित्त आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनेचे थेट नाव घेतले नाही. ते म्हणाले, या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना (शिवसेना- विश्व हिंदू परिषद) स्वत:चा प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहे, असा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला. विश्व हिंदू परिषदेतर्फेही २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र गिरी यांनी ही प्रतिक्रिया दिली. जर हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचा मंदिर निर्माण करणे हा त्यांचा हेतू असता तर त्यांनी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले असते का?. या दोन्ही संघटनांच्या कार्यक्रमातून मंदिर बांधण्यासंदर्भात तोडगा निघणार नाही, असा दावाही त्यांनी केला. आखाड्याशी संबंधित साधू- संत शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांपासून फारकत घेऊन आखाडा परिषद ४ आणि ५ डिसेंबर रोजी अयोध्येत स्वतंत्र बैठक घेणार आहे. या बैठकीत अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारींसह मुस्लीम धर्मगुरुंनाही आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.