नवी दिल्ली: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपमध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे विधान राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी केले.
सत्तार यांनी मराठवाडय़ातील विकासकामांसंदर्भात गडकरी यांची भेट घेतली. नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आहेत. त्यांनी पूल बांधायचे ठरवले तर ते कसेही आणि कुठेही उभे राहू शकतात. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल उभारून दोन्ही पक्षांमधील नातेसंबंध जोडले जाऊ शकतात. गडकरी यांनी मनावर घेतले तर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतील. गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सत्तार वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
‘रश्मी ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे सांभाळू शकतात. रश्मी ठाकरे यांना राज्यातील राजकारणाची जाण आहे व त्यांच्याकडे क्षमताही आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला कोणीही विरोध करू शकणार नाहीत, असेही सत्तार म्हणाले.