रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी पैसा कुठून येईल याबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याचे सांगून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने रेल्वे अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
आम्ही अर्थसंकल्पाबाबत पूर्णपणे असमाधानी आहोत. मंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक गोष्टी म्हटल्या आहेत, परंतु त्यासाठीचा पैसा कुठून येईल, असा प्रश्न सेनेचे मुंबईतील गजानन कीर्तिकर यांनी विचारला आणि अर्थसंकल्पाने सर्वानाच अंधारात ठेवल्याची टीका केली.
महाराष्ट्र विधानसभेत निवडणुकीनंतर तडजोड झाल्यानंतरही शिवसेनेने भूमी संपादन कायद्यासह अनेक मुद्दय़ांवर भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याने दोघांच्या संबंधात सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सुरेश प्रभू यांनी शिवसेना सोडली होती, हा पदरही या टीकेला आहे.
रेल्वेमंत्री फलाटांची उंची वाढवण्याबाबत बोलत असून त्यासाठी ९७ कोटी रुपयांची गरज आहे. असे प्रकल्प एकाच वेळी पूर्ण व्हायचे असतील तर त्यासाठी खर्चाची तरतूद होणे आवश्यक आहे. काही मार्गाचे दुहेरीकरण व तिहेरीकरण करण्याबाबतही ते बोलले आहेत, परंतु हे मार्ग कोणते, याबाबत मात्र त्यांनी अंधारात ठेवले आहे, असे कीर्तिकर म्हणाले.
हा अर्थसंकल्प चांगला, पण समजण्यास कठीण आहे, अशी कोपरखळी सेनेचे मराठवाडय़ाचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मारली. ‘अर्थसंकल्पात आमच्या भागाला काय मिळाले’, असा प्रश्न लोक आम्हाला विचारतील. आता संपूर्ण अर्थसंकल्प वाचून आम्हाला याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल असे ते म्हणाले.