महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहातील मुस्लीम तरुणाचा रोजा मोडल्यामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या शिवसेनेने आधी असे काही घडलेच नसल्याचा दावा केला, मात्र नंतर या प्रकरणाची चित्रफीत समोर आल्यानंतर ‘त्या तरुणाच्या धर्माबद्दल माहिती नव्हती’ अशी सारवासारव करत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी बुधवारी दिलगिरी व्यक्त केली.
महाराष्ट्र सदनातील जेवण, पाणी, व्यवस्था, लोकप्रतिनिधींना दिली जाणारी सेवा याविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दि. ८ जुलै रोजी निवासी आयुक्त विपीन मलिक यांना पत्र लिहिले होते. त्यास उत्तर न दिल्याने सेनेचे ११ खासदार १७ जुलै रोजी सदनात धडकले. मलिक यांना त्यांनी भेटण्यासाठी बोलावले; परंतु मलिक  यांनी येण्याचे टाळले. त्यावर संतप्त झालेल्या सेना खासदारांचा सदनात राडा सुरू झाला. त्यांनी ‘आयआरसीटीसी’च्या अधिकारांना बोलवा, अशी आरडाओरड सुरू केली. आयआरसीटीसीने सदनाच्या व्यवस्थापनासाठी शंकर मल्होत्रा या अधिकाऱ्यास नेमले आहे. मल्होत्रा यांच्या सांगण्यावरून एक कर्मचारी खासदारांना सामोरा गेला. राजन विचारे यांनी हातातील पोळी या कर्मचाऱ्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सदनात दाखल झाले. ‘तो’ कर्मचारी कोणत्या धर्माचा होता, याची माहिती कुणालाही नव्हती, असा दावा खा. अरविंद सावंत यांनी केला. मात्र अर्शद झुबेर या कर्मचाऱ्याचा रोजा तोडण्याचा प्रयत्न सेना खासदारांनी केल्याने त्याची धार्मिक भावना दुखावली गेली आहे, असे मल्होत्रा यांनी मलिक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर अर्शदने आपल्या तोंडात चपात्या कोंबण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी उपहारगृहाच्या गणवेशात होतो असा दावा केला आहे.
‘आवाज दाबण्याचा प्रयत्न’
मुंबई:महाराष्ट्र सदनातील शिवसेना खासदारांच्या कृत्यावरून झालेला गदारोळ हा शिवसेना खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी अन्य धर्माविषयी आदर बाळगतो असे उद्धव यांनी सांगितले.  

Story img Loader