शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे आपले दैवत असल्याचे गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनकर्त्यांचा नेता हार्दिक पटेलने म्हटले आहे. पटेल समाजासाठी नवा कोणताही राजकीय पक्ष काढण्याचा आपला मनोदय नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. गुजरातमधील १८२ मतदारसंघांचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात असताना मला कोणत्याही नव्या राजकीय पक्षाची गरजच काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पटेल समाजाच्या आंदोलनाला मंगळवारी रात्री हिंसक वळण लागले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या वेगवेगळ्या भागात तणावपूर्ण शांतता आहे. स्वतः हार्दिक पटेल सातत्याने आपली जागा बदलत असून, तो अहमदाबादजवळच वास्तव्याला आहे.
मंगळवारी रात्री पोलीसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर अहमदाबाद, सूरत, वडोदरा, मेहसाणा, पोरबंदर येथे हिंसाचार भडकला होता. आंदोलनकर्त्यांनी पोलीसांवर दगडफेक करतानाच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. याबद्दल हार्दिक म्हणाला, त्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो होतो. पण अचानक पोलीसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली. जनरल डायर याने ज्या पद्धतीने जालियनवाला बागमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याचप्रमाणे इथेही लाठीमार करण्यास सुरुवात केली गेली. गुजरात पोलीसांमध्ये कोण जनरल डायर आहे, हे समजलेले नाही. ज्या दिवशी ती व्यक्ती कोण आहे, हे स्पष्ट होईल. त्यादिवशी जनरल डायरप्रमाणे लोक त्यालाही मारतील, असा इशारा हार्दिकने दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena supremo balasaheb thackeray are also my idol says hardik patel