सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू असून राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सोमवारी राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. जीएसटी, नोटबंदी, अग्नीवीर योजना, शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्यांवर राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचं सभागृहात काल पहिल्यांदाच भाषण होतं. यावेळी लोकसभेत राहुल गांधींनी आक्रमक होत हिंदुत्वाच्या मुद्यांवरून भारतीय जनता पार्टीवर टीका केली.

राहुल गांधींनी भाजपावर केलेल्या या टिकेला समर्थन देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. “राहुल गांधींनी भाजपाच्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा काढला, सत्ताधाऱ्यांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण माघावं लागलं, एकटे राहुल गांधी हे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह ९ मंत्र्यांना भारी पडले आहेत”, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा : “…तर मी राजीनामा देतो”, सभागृहातील गोंधळासंदर्भात बोलताना अंबादास दानवेंचं विधान

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

“राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधींनी सभागृहात केलेलं भाषण हे देशाला दिशादर्शक होतं. राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाच्या खोट्या हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला. राहुल गांधी यांनी काय चुकीचं सांगितलं? उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजपा नेहमी आरोप करतं की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. तेव्हा उद्धव ठाकरे ज्या प्रकारे उत्तर देतात, त्याच प्रकारे काल राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे सांगतात आम्ही भारतीय जनता पक्षाला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही. राहुल गांधींनी सभागृहात सांगितलं की, हिंदुत्वाचा ठेका हा मोदींनी घेतलेला नाही. भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाचा विचार हा खूप मोठा आहे. ते भाजपाला समजलेलं नाही”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

राऊत पुढे म्हणाले, “९ मंत्री आणि एका गृहमंत्र्यांवर एक अकेला सब पर भारी. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी सर्वांना भारी पडले आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. खरं तर कालचं चित्र वेगळं होतं. मागील १० वर्षात देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेमध्ये लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण माघावं लागलं. कालपर्यंत यांच्यापासून आम्हाला संरक्षण माघावं लागत होतं. एवढी यांची दादागिरी होती. राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं. मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो? हे देशाला काल दिसलं. ही सुरुवात आहे अजून पुढे काय होतं ते पाहा”, असा इशारा संजय राऊतांनी दिला.

विधान परिषदेतील गोंधळाबाबत राऊत काय म्हणाले?

सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे.

यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षाची झालर टाकून टोळ्या बनवल्या आहेत, त्या टोळ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते जरुर आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळले आहेत. पण आमच्या अंगावर कोणी येत असेल तर शिवसैनिक म्हणून आम्हाला त्यांच्यावर त्या पद्धतीने चाल करावी लागेल. या सर्व लोकांना हिंदुत्व काय माहिती? हे सर्व लोक देवेंद्र फडणवीसांनी गोळा केलेले आहेत. जे दिल्लीमध्ये आहे तेच महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खऱ्या भारतीय जनता पक्षाचा नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.