Delhi Assembly Election 2024 Shivsena UBT Back AAP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी २०२४ मध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने गुरूवारी ५ फेब्रुवारी रोजी होणार्‍या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना यामागचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांचा पक्ष आपला पाठिंबा देईल.

आम आदमी पक्ष, शिवेसना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस हे विरोधाकांच्या इंडिया आघाडीमधील सहकारी पक्ष आहेत. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढच आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र येत लढली होती.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर लगेच शिवसनेना(उद्धव ठाकरे) पक्षाने देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंडिया आघाडीतील आणखी एक सहकारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील दिल्ली निवडणुकीत त्यांचा पक्ष आपच्या पाठीशी असेल असे जाहीर केले होते.

हेही वाचा>> टोरेस कंपनीत १३ कोटी बुडाले… भाजी विक्रेत्याने सांगितलं नेमकं काय झालं?…

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी तयार करण्यात आली होती आणि प्रत्येक निवडणुकीत युती म्हणून त्याचा विचार केला पाहिजे असे म्हटले आहे. राऊत म्हणाले की, “आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत की काँग्रेस देशातील मोठा पक्ष आहे पण आप हा दिल्लीतील मोठा पक्ष आहे. दिल्लीत आपकडे जास्त ताकद आहे. दिल्लीतील वातवरण असं आहे की आप मोठ्या फरकाने निवडणुका जिंकत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला काँग्रेस देशद्रोही म्हणते याचे आमच्या पक्षाला दुःख आहे. त्यांच्या विरोधात अशी मोहीम चालवणे चांगले नाही आणि आम्हाला ते मान्य नाही”.

“महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसबरोबर होतो. आप देखील आमचा सहकारी आहे. दोघांनीही प्रचारात समतोल राखला पाहिजे. आमच्यासारखे अनेक पक्ष दिल्लीत काय करायचे या द्विधा मनस्थितीत आहेत. आमचे दोन्ही पक्षांशी चांगले संबंध आहेत”, असेही राऊत पुढे बोलताना म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आपला पाठिंबा देण्याचा निर्णय मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आला आहे. या निवडणुका काँग्रेसला बरोबर न घेता स्वातंत्र्य लढवण्याची शिवसेना (ठाकरे) पक्षाची योजना आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अनेक शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसबरोब युती करण्याऐवजी पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे मत व्यक्त केले आहे. तसेच संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात बोलताना अनेक वेळा याबद्दलचे संकेत दिले आहेत.

दिल्ली निवडणुकीत आप, भाजपा आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे . या निवडणुकीचा ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt backs aap in delhi assembly election after tmc and samajwadi party marathi news rak