CM Devendra Fadnavis: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या हल्ल्याची आणि त्यानंतरच्या कारवाईची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने गुरूवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. या बैठकीला काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षातील अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र शिवसेनेच्या (ठाकरे) खासदारांनी बैठकीला दांडी मारली. त्यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

शुक्रवारी (दि. २५ एप्रिल) माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “या देशाचा इतिहास उबाठा गट विसरलेला दिसतो. युद्धाची किंवा युद्धसदृश्य परिस्थिती असताना आणि देशावर हल्ला झालेला असताना भारतातील राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. हा या देशाचा इतिहास आहे. बांगलादेशच्या युद्धादरम्यान देशात राजकीय पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होता. तरीही स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्व. इंदिरा गांधींना पूर्ण पाठिंबा दिला होता. ही या देशाची परंपरा राहिली आहे.”

“मात्र अशा परिस्थितीत उबाठा गटाकडून विरोध करणे, उपहास करणे किंवा मूर्खासारखी वक्तव्ये करणे सुरू आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दरम्यान गुरूवारी दिल्लीत बैठक सुरू होण्यापूर्वी शिवसेनेचे (ठाकरे) उपनेते अरविंद सावंत यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती. देशातील विविध भागांत दौऱ्यावर असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीस वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे शक्य नसल्याचे अरविंद सावंत यांनी पत्राद्वारे कळविले.

शरद पवारांच्या विधानाचाही समाचार फडणवीस यांनी घेतला. पहलगाम येथे धर्म विचारून गोळ्या घातलेल्या नाहीत, असे शरद पवार म्हणाले असल्याचा प्रश्न माध्यमांनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांचे विधान मी ऐकलेले नाही. पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले आहेत. ते काय म्हणाले, हे मी ऐकलेले आहे. शरद पवारांनीही आप्तेष्टांचे म्हणणे ऐकावे.

नरेश म्हस्केंची जीभ घसरली असेल

दरम्यान खासदार नरेश म्हस्केंच्या विधानावरही फडणवीस यांनी खोचक टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमधील पर्यटकांची मदत केल्यामुळे अनेकांना पहिल्यांदा विमानात बसता आले, असे ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, नरेश म्हस्के यांची बोलताना कदाचित जीभ घसरली असेल. अनेकदा बोलताना भान उरत नाही. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य योग्य नाही. त्यांनी हे विधान करू नये.