Shiv Sena UBT Sanjay Raut Allegation on PM Modi Former CJI DY Chandrachud : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप कले. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल (१४ डिसेंबर) सहभाग घेतला. मोदींनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान संविधानावर देशातील राजकीय वर्तुळात सुरू असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार फोडणे तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकणे हे कोणत्या संविधानात बसते? असा सवाल त्यांनी विचारला आहे. याबरोबरच राऊतांनी आमदार अपात्रता प्रकरणी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरही गंभीर आरोप केले.
संजय राऊत म्हणाले की, “विरोधी पक्षाला संसदीय लोकशाहीत महत्त्वाचं स्थान आहे, पण विरोधी पक्ष राहू नये यासाठी तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणे, विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकणं हे कोणत्या संविधानात लिहिलं आहे?”
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “ईडी, सीबीआय कधी भाजपा नेत्याच्या घरी गेलीय हे दाखवावं. उलट आमच्याकडे असताना ज्यांच्या घरी गेली होती ते आज मोदींच्या मांडीवर बसले आहेत आणि मोदी त्यांना दूध पाजत आहेत. आईच्या ममतेने मोदी त्यांची काळजी घेत आहेत. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा ज्यांच्यावर मोदींनी आरोप केला, त्यांना तुमच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते, हे कोणत्या संविधानात लिहीले आहे? हे सांगा.”
आमदार आपात्रता प्रकरणी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोदींच्या दबावाखाली निर्णय घेतला नाही असा आरोपही राऊतांनी केला आहे. ते म्हणाले की “ज्या पद्धतीने राज्यातील सरकारमधील आमदार फोडले, १०व्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरले पाहिजेत. मात्र नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाने, चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. हे काय संविधानात बसतं का? चंद्रचूड यांच्यावरती खरंतर खटला दाखल केला पाहिजे.”
“ज्या पद्धतीने मोदी हे राज्य चालवत आहेत ते संविधानाच्या विरोधात आहे. संविधान हा देशाचा आधार आहे आणि तो आधार नरेंद्र मोदी यांनी उद्ध्वस्त केला आहे”, असेही राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा>> एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अमित शाह यांचं मोठं विधान…
मोदी असत्य बोलणारे सगळ्यात महान पंतप्रधान
राऊतांनी मध्य प्रदेशमधील परमार दाम्पत्याच्या आत्महत्येचा मुद्दादेखील उपस्थित केला.”मध्य प्रदेश मध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्यांच्या लहान मुलाने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला गल्ला दान केला. तो राग ठेवून ईडीने त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर भाजपामध्ये जाण्यासाठी दबाव टाकला, त्या आई-वडीलांनी आत्महत्या केली. हे मोदींच्या संविधानात आहे का? हे मोदींनी सांगावं. मोदी हे या देशाला लाभलेले गेल्या ६५ वर्षातील असत्य बोलणारे सगळ्यात महान पंतप्रधान आहेत”, असे राऊत म्हणाले.
अदाणी यांना जे विरोध करतात ते संविधान विरोधी
अदाणींना विरोध करतात त्यांना संविधानविरोधी ठरवले जाते असा आरोप राऊतांनी केला. ते म्हणाले की, “आमच्या संविधानाचा नारा आहे ‘सत्य मेव जयते’ पण गेल्या १० वर्षात फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात झालं आहे. मोदींचा नवीन संविधानकर्ता कोणी असेल तर तो गौतम अदाणी हे आहेत. गौतम अदाणी यांना जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत हे मोदींना सांगायचे आहे.”