राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला वैमानिक शिवांगी सिंह बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या चित्ररथाचा भाग होत्या. शिवांगी या भावना कंठ नंतर भारतीय वायूदलाच्या चित्ररथाचा भाग असणारी दुसऱ्या महिला फायटर जेट पायलट आहे. गेल्यावर्षी चित्ररथाचा भाग असणाऱ्या भावना कंठ पहिल्या महिला फायटर जेट पायलट होत्या. यावेळी चित्ररथावर असलेल्या शिवांगी सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी दिली.
वाराणसीच्या रहिवासी असलेल्या शिवांगी सिंह २०१७ मध्ये भारतीय वायूदलात रुजू झाल्या होत्या. त्यांना IAF च्या महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. राफेल लढाऊ विमान उडवण्यापूर्वी त्या मिग-२१ बायसन विमान उडवत होत्या. शिवांगी पंजाबमधील अंबाला येथील IAF च्या गोल्डन एरो स्क्वॉड्रनचा देखील एक भाग आहे.
या वर्षीच्या भारतीय वायू दलाचा चित्ररथ थीम ‘भविष्यासाठी भारतीय वायुसेनेचे परिवर्तन’ या थीमवर आधारीत होता. त्याशिवाय राफेल फायटर जेटचे छोटे मॉडेल, स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि 3D सर्विलांस रडार Aslesha MK-1 हे फ्लोटचा भाग होते. १९७१ च्या युद्धात मोठी भूमिका बजावलेल्या आणि युद्धात भारताला पाकिस्तानचा पराभव करण्यास मदत करणाऱ्या मिग-21 विमानाच्या छोट्या मॉडेलचाही त्यात समावेश होता. हवाई दलाच्या या चित्ररथात भारताचे पहिले स्वदेशी विकसित विमान, Gnat चे मॉडेल देखील समाविष्ट होते.