IPS Shivdeep Lande on Political Entry: बिहार पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी काल (दि. १९ सप्टेंबर) अचानक राजीनामा दिल्यानंतर ते चर्चेत आले. फेसबुकवर पोस्ट टाकून शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली. तसेच राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. लवकरच बिहारच्या विधानसभा घोषित होणार आहेत. त्यामुळे शिवदीप लांडे बिहारच्या राजकारणात उतरणार असल्याची शक्यता अनेक माध्यमांनी वर्तविली होती. मात्र या चर्चांनंतर आता थेट शिवदीप लांडे यांनीच पोस्ट टाकून याबाबत खुलासा केला आहे.

काय म्हणाले शिवदीप लांडे?

शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून राजकारणात प्रवेश घेण्याबाबत खुलासा करताना म्हटले, “मी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर सर्वांनी प्रेम आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला वाटले नव्हते की, लोकांचे एवढे प्रेम मिळेल. मी राजीनामा दिल्यानंतर अनेक माध्यमांनी मी राजकारणात उतरणार असल्याचे किंवा राजकीय पक्षात जाणार असल्याची शक्यता वर्तविली. पण मी या पोस्टमधून सांगू इच्छितो की, माझी कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा सुरू नाही किंवा कोणत्याही पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचा विचार केलेला नाही. त्यामुळे कृपया मला कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडू नये.”

हे वाचा >> IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?

प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी जनसुराज पक्षाची स्थापना केलेली आहे. २०२५ रोजी होणाऱ्या बिहार विधानसभेत सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी जाहीर केलेले आहे. त्यांनी विद्यमान सत्ताधारी नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी या पक्षांवर टीका केलेली आहे. हे दोन्ही पक्ष बिहारचा विकास करू शकलेले नाहीत, अशी मांडणी ते गावोगाव फिरून करत होते. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी सामान्य लोकांमधून बिहारच्या विकासाची तळमळ असणाऱ्या लोकांना पुढे येण्याचे आवाहन केले होते.

शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर भारतातील वृत्त संकेतस्थळांनी ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षातून निवडणूक लढविणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशांत किशोर राजकीय पक्षाची घोषणा करतील. यावेळी शिवदीप लांडे पक्षप्रवेश करणार असल्याची अटकळ काही माध्यमांनी व्यक्त केली आहे.

माजी आयपीएस शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. त्यानंतर त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.

मुंबईत यूपीएससीची तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यूपीएससीची परीक्षा दिली आणि २००६ साली ते आयपीएससाठी निवडले गेले. लांडे यांना बिहार केडर मिळाले आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली. यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केले.

बिहार पोलीस दलाच्या कार्यशैलीवर नाराज

शिवदीप लांडे सध्या बिहारमधील पूर्नीयाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून काम करत होते. महत्त्वाचे म्हणजे, २०१९ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. मिश्रा यांच्याप्रमाणेच लांडे यांनीही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लांडे हे अजिबात तडजोड न करणारे अधिकारी होते. त्यामुळेच बिहार पोलीस प्रशासनाच्या सध्याच्या कार्यशैलीवरून ते नाराज होते. मुंबईत पाच वर्ष सेवा देऊन बिहारमध्ये परतल्यानंतर ते नाराज असल्याचेही सांगण्यात येत होते.