Shivraj Chouhan Slams Air India management Over allotted broken seat : केंद्रीय कृषीमंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एअर इंडियाच्या विमानाच तुटलेल्या सीटवर बसून प्रवास करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर चौहान यांनी एअर इंडियाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चौहान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी मला वाटलं होतं की एअर इंडियाची धुरा भारत सरकारकडून टाटा कंपनीकडे गेली त्यानंतर तरी त्याची स्थिती सुधारली असेल, पण हा माझा भ्रम ठरला अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विमान कंपनी़ कडून ही ग्राहकांची फसवणूक नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या पोस्टमध्ये या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आज मला भोपाळहून दिल्लीला यायचे होते, पूसा येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन, कुरुक्षेत्र येथे नैसर्गिक शेती मिशनची बैठक आणि चंदीगड येथे शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करायची आहे. मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 मध्ये तिकीट बुक केले होते, मला सीट क्रमांक ८ सी मिळाली होती. मी जाऊन सीटवर बसलो, तर सीट तुटलेली आणि खाली खचलेली होती. बसायला त्रास होत होता. मी जेव्हा विमानातील कर्मचाऱ्यांना विचारले की सीट खराब होती तर ती देण्यात का आली? त्यांनी सांगितलं की व्यवस्थापनाला आधीच याबद्दल माहिती दिली होती की ही सीट व्यवस्थित नाही, याचे तिकिट विकले जाऊ नये. अशी एकच नाही तर अनेक सीट्स आहेत.”

टाटा व्यवस्थापनाने हातात घेतल्यावर तरी…

“सहप्रवाशांनी खूप आग्रह केला की मी त्यांच्याबरोबर सीट बदलून चांगल्या सीटवर बसावे मात्र मी आपल्या दुसर्‍या एखाद्या मित्राला त्रास का देऊ, मी निर्णय घेतला की मी याच सीटवर बसून प्रवास पूर्ण करणार. माझी समजूत होती की टाटा व्यवस्थापनाने हातात घेतल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण हा माझा भ्रम ठरला,” अशी खंतही चौहान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

“मला बसण्यासाठी झालेल्या त्रासाची चिंता नाही मात्र प्रवाशांकडून पूर्ण पैसै वसूल करून त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसायला लावणे नैतिकतेला धरून नाही. हा प्रवास करणार्‍यांबरोबर धोका नाही का? यानंतर कोमत्याही प्रवाशाला अशा त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी इअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल की प्रवाशांच्या लवकर पोहचण्याच्या अडचणीचा असाच गैरफायदा घेत राहिल,” असा सवालही चौहान यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivraj chouhan slams air india management over allotted broken seat during flight marathi news rak