एरवी उठसूट इतरांना राष्ट्रप्रेमाचे धडे शिकवणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडून ‘ऐतिहासिक’ चुका घडल्याचे अनेक प्रकार आजवर समोर आले आहेत. आता या नेत्यांमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली आहे. राष्ट्रध्वजाच्या निर्मितीमधील प्रमुख शिलेदार असणारे पी. व्यंकय्या यांच्या जयंती व पुण्यतिथीमध्ये घातलेल्या घोळामुळे या दोघांनाही सध्या नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. २ ऑगस्ट हा दिवस पी. व्यंकय्या यांचा जयंती दिन आहे. मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पिंगली व्यंकय्या यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. यानंतर नेटिझन्स त्यांच्यावर चांगलेच तुटून पडले. चौहानजी तुम्ही जन्मदिवसाचा मृत्यूदिन केला, यालाही लोकशाहीची हत्या समजायची का, असा सवाल पत्रकार अभय दुबे यांनी विचारला. तर एका ट्विटरकराने शिवराज यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. त्यामुळेच तुम्हाला ‘शवराज’ म्हणतात, अशी उपरोधिक टीका या युजरने केली.
पिंगली व्यंकय्या यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. १९२१ साली त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत लाल आणि हिरव्या रंगाचा राष्ट्रध्वज सादर केला होता. यावेळी महात्मा गांधीजींनी केलेल्या सूचनेनंतर त्यांनी राष्ट्रध्वजावर पांढऱ्या रंगाची पट्टी आणि लाला हरदयाळ यांच्या सांगण्यानुसार विकासाचे प्रतीक म्हणून चरख्याला जागा दिली. त्यानंतर १९३१ मध्ये काँग्रेसने लालऐवजी केशरी रंग वापरून या ध्वजाला पक्षाचा अधिकृत ध्वज केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच झेंड्याची राष्ट्रध्वज म्हणून निवड झाली. मात्र, नंतरच्या काळात राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारे पिंगली व्यंकय्या लोकांच्या विस्मरणात गेले. अखेर ४ जुलै १९६३ रोजी विजयवाडा येथे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे निधन झाले.
Remembering #PingaliVenkayya on his birth anniversary. He was not only a brave freedom fighter but the artist who gave us our National Flag. pic.twitter.com/XHhGaPZYCL
— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) August 2, 2017