Shivraj Singh Chauhan Car Stuck in Pothole Viral Video: पावसाळा म्हटलं की अनेकांना अनेक प्रकारचं चित्र डोळ्यांसमोर येतं. कुणाला भरभरून प्रवाहित होणाऱ्या नद्या, धबधबे दिसतात, तर कुणाला चहुबाजूंनी हिरवागार झालेला निसर्ग. पण काहींसाठी पावसाळा म्हणजे रस्ते आणि खड्डे असंच समीकरण झालेलं असतं. मुंबईकरांसाठी तर ही नित्याचीच बाब झाली असून प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना ठराविक कालावधीत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा निर्धार करावा लागला इतके मुंबईत खड्डे वाढले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमधून वाट काढत मार्गक्रमण करणं, हे सामान्यांसाठी रोजचंच आव्हान ठरलेलं असताना सोमवारी चक्क केंद्रीय मंत्र्यांचीच गाडी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अडकली!

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान सोमवारी झारखंडच्या बहरागोडा भागात दौऱ्यासाठी फिरत आहेत. या दौऱ्यामध्ये ते महिला सुरक्षा, रोजगार व इतर मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत आहेत. याच दौऱ्याच्या निमित्ताने एका सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी शिवराजसिंह चौहान निघाले असताना त्यांना सामान्य व्यक्ती दररोज ज्या गोष्टीचा सामना करतो किंवा वाट काढण्यासाठी त्या गोष्टी चुकवतो, अशा गोष्टीचा अनुभव आला. अर्थात पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा!

मंत्र्यांची गाडी खड्ड्यात, सुरक्षारक्षकांची तारांबळ!

केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची JH05 BN 6537 ही गाडी भर पावसात रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकल्याचा Video सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडीच्या आत शिवराज सिंह चौहान बसलेले असताना त्यांचे काही सुरक्षारक्षक गाडी नेमकी खड्ड्यात अडकली कशी? हे शोधण्यासाठी गाडीच्या आजूबाजूला फिरत असताना दिसत आहेत. त्याचवेळी, एक सुरक्षारक्षक मात्र हातात छत्री घेऊन दरवाज्याजवळ उभा आहे. शिवराज सिंह चौहान यांना गाडीमधून बाहेर येण्याची तो विनंती करत असल्याचं दिसत आहे.

सुरक्षा रक्षकांनी वारंवार गाडीच्या चहुबाजूंनी फिरल्यानंतर खड्ड्यातून गाडी बाहेर येण्याचा कोणताही पर्याय त्यांना लागलीच सापडला नाही. अखेर शिवराज सिंह चौहान हे भर पावसात आणि भर रस्त्यात छत्रीच्या आधारे गाडीतून बाहेर त्या खड्ड्यातच उतरले आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला थांबण्याचा पर्याय निवडला. शेवटी सुरक्षा रक्षकांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर गाडी खड्ड्यातून बाहेर निघून मार्गस्थ झाली आणि सर्वच सुरक्षारक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला!

Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव

शिवराज सिंह चौहान यांच्यावर नवी जबाबदारी!

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी आपला करिश्मा दाखवत भाजपाला घवघवीत यश मिळवून दिलं. मात्र, त्याचवेळी राज्यात मुख्यमंत्रीपदाची कोणतीही जाहीर अपेक्षा न ठेवता शिवराज सिंह चौहान केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, त्याचबरोबर चौहान यांच्यावर आता मध्य प्रदेशपाठोपाठ झारखंडमध्येही तोच करिश्मा करून दाखवण्याची जबाबदारी पक्षानं सोपवली आहे. त्यानुसार, चौहान झारखंडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन भाजपाचा प्रचार करत आहेत.