भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केलीय. राहुल गांधी स्वतः काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे ते असेपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं, असंही त्यांनी म्हटलं. त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केलाय.
शिवराज सिंह चौहान म्हणाले, “सध्या राहुल गांधी स्वतः काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत. पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही.”
दुसरीकडे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील पंजाबमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया दिलीय. “पंजाबमध्ये काय स्थिती आहे हे आपण सर्व पाहतो आहे. तेथे सुरू असलेल्या राजकीय घडामोडी चिंताजनक आहेत. कारण पंजाब सीमेवरील राज्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी पंजाबमध्ये स्थिरता राहणं अनिवार्य आणि महत्त्वाचं आहे.”
“नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्ष सर्वोच्च असल्याचं सांगितलं”
चरणजीत सिंग चन्नी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “जो कुणी पक्षाचा अध्यक्ष असतो तो कुटुंबाचा प्रमुख असतो. मी नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली आणि पक्ष सर्वोच्च असल्याचं सांगितलं. मी त्यांना फोन करुन भेटून चर्चा करण्याविषयी आणि हा विषय सोडवण्याबाबत चर्चा केली.”
चन्नींच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट नेत्यांना स्थान, भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग : केजरीवाल
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर आहेत. त्यांनी मोहालीत बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट नेत्यांना जागा देण्यात आल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने मी चन्नी यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग देण्यात आल्यात. मी या सर्वांना बडतर्फ करण्याची मागणी करतो.”
पंजाबमध्ये ५३ लाख कुटुंबांचं वीज बिल माफ, मुख्यमंत्री चन्नी यांची मोठी घोषणा