मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या या निवडणुकीत भाजपाने २३० पैकी १६३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, भाजपाचे केंद्रीय नेते मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाला देणार? याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. अखेर सोमवारी भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे शिवराजसिंह चौहान यांच्यासह समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी चौहान यांना विचारण्यात आलं की, निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही दिल्लीला न जाण्याबाबतचं वक्तव्य का केलं होतं? यावर माजी मुख्यमंत्री चौहान म्हणाले, मी पक्ष नेतृत्वकडे काहीतरी मागण्यापेक्षा मरण पत्करेन.

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार आपली अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करेल. मध्य प्रदेशचा विकास करेल. मी नेहमीच मोहन यादव यांना मदत करत राहीन. मी आज खूप समाधानी आहे. २००३ मध्ये उमा भारती यांच्या नेतृत्वात आपण बहुमतातलं सरकार स्थापन केलं होतं. पुढच्या काळात मी त्याच सरकारचं नेतृत्व केलं. २००८ मध्ये पुन्हा एकदा आपण बहुमत मिळवलं. २०१३ मध्येदेखील आपण जिंकलो. २०१८ मध्ये आपल्याला जास्त मतं मिळाली खरी, परंतु आमदारांच्या संख्येचं गणित जुळून आलं नाही. परंतु, वर्षभराने पुन्हा आपण सत्तेत आलो. आज मी इथून निघत असलो तरी माझ्या मनात समाधान आहे. पुन्हा एकदा आपल्याला बहुमत मिळाल्याने मी खूश आहे.

मुख्यमंत्रीपद न मिळण्याबाबत तसेच दिल्लीला न जाण्याच्या निर्णयाबद्दल विचारल्यावर शिवराज सिंह चौहान म्हणाले, मी एक गोष्ट खूप नम्रतेने सर्वांना सांगू इच्छितो की, स्वतःसाठी काहीतरी मागायला जाण्याऐवजी मी मरण पत्करेन. त्यामुळेच मी म्हणालो होतो की, मी दिल्लीला जाणार नाही.

हे ही वाचा >> राहुल गांधींनी कमळ हातात घेतलं अन्.. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चिखलातील फोटो चर्चेत, पण..

चौहान म्हणाले, भाजपाच्या लाखो कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीने, त्याचबरोबर केंद्र आणि राज्याच्या कल्याणकारी योजनांमुळे आपलं सरकार स्थापन झालं आहे. मला आणखी एका गोष्टीचं समाधान आहे की, आपल्याला वारसा म्हणून एक बिमारू (मागासलेलं) राज्य मिळालं होतं. परंतु, आम्ही त्यातून विकासाची वाट काढली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivraj singh chouhan says would rather die intead of asking favours from bjp supreme leaders asc