बाबरी मशीद तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे असलेले नाव रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नुकतेच निधन झाले.त्यामुळे सीबीआयने त्यांचे नाव आरोपपत्रातून काढून टाकण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती.
दरम्यान, याप्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि इतर १९ जणांविरोधात प्रलंबित असलेल्या खटल्याची तातडीने सुनावणी कारावी, असे निर्देश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रायबरेली न्यायालयाला दिले आहेत. बाबरीप्रकरणी दोषी मानल्या गेलेल्यांवरील गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप विशेष न्यायालयाने रद्द केले होते.
न्या. एच.एल. दत्तू आणि के.सी. प्रसाद यांच्या खंडपीठाने या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे वकील या प्रकरणी न्यायालयात उपस्थित न राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सीबीआयनेच अडवाणीसह इतर नेत्यांवरील आरोप रद्द करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
बाबरी मशीद तोडल्याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह कल्याण सिंग, उमा भारती, सतीश प्रधान, सी. आर. बन्सल, एम. एम. जोशी, विनय कटियार, अशोक सिंघल, गिरिराज किशोर, साध्वी ऋतंभरा, व्ही. एच. दालमिया, महंत अवैदनाथ आणि अन्य नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Story img Loader