मोदी सरकार पाकिस्तानला नुसते ठोकणार बोलत नाही तर ठोकते. मोदीजी यापुढे पाकिस्तानला कुरापत काढण्याइतकेही शिल्लक ठेऊ नका असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते लातूर औसा येथील महायुतीच्या सभेत बोलत होते. या सभेच्या निमित्ताने प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं म्हणजे करायचंच. समर्थ, संपन्न हिंदुस्थानसाठी भगव्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसुमदायाला केले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपन्यांचे कार्यालय असले पाहिजे अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
रझाकारांच्या वेळेस जसे वल्लभभाई मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिले. सैन्य घुसवण्याच्या निर्णयावर कायम राहिले तसेच मोदीजी तुम्ही मराठवाडयाच्या पाठीशी उभे राहा असे उद्धव म्हणाले. एरवी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर सडकून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे प्रशस्तीपत्रक यावेळी दिले. भाजपाच्या जाहीरनाम्यातील मुद्यांचेही कौतुक केले. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे थापा असल्याचे उद्धव म्हणाले.