राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या जवळपास १३ आमदारांसोबत संपर्काबाहेर आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. दरम्यान सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. त्यातच एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदेंसोबत राज्यातील कोण आमदार आहेत? ही घ्या संपूर्ण यादी

सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील नेत्यांच्या संपर्कात आहेत. गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर काही आमदारांनी पाटील यांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान पाटील यांनी यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं असून ‘मी गांधीनगरमध्ये असून काही आमदार सूरतमध्ये आल्याची माहिती मिळाली,’ असल्याचं म्हटलं आहे.

मतं फुटली…

शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला राज्यसभेपेक्षाही दहा मतं अधिक मिळाल्याचं उघड झालं असून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena eknath shinde le meridien hotel surat tight security gujarat bjp chief cr patil sgy