संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात विरोध केला असताना, शिवसेनेने या चित्रपटाच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीमध्ये वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले.
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झाला. पुण्यातील कोथरूड सिटी प्राईड चित्रपटागृहाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाविरोधात निदर्शने करीत त्याचे शो बंद पाडले. यामुळे सिटी प्राईड चित्रपटगृह व्यवस्थापनाने ‘बाजीराव-मस्तानी’चे शुक्रवारचे सर्व शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, ऐतिहासिक पुरुषांवर चित्रपट बनतो, त्यावेळी त्यात थोडे व्यावसायिक स्वातंत्र्य घ्यावे लागते. या चित्रपटाच्या निमित्ताने बाजीरावासारख्या योद्ध्याची कथा मोठ्या पडद्यावर आली आहे, याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader