भाजपाचं हिंदुत्व हे ढोंगी, नकली आणि फसवं असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच राऊत यांनी शिवसेना केंद्रासोबत लढण्यासाठी तयार असल्याचं थेट आव्हानही या वेळेस दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा असो किंवा केंद्रातील सत्ता असो आम्ही लढण्यास तयार आहोत असं राऊत म्हणालेत.
आमचं पॉवरचं हिंदुत्व आहे असं भाजपाकडून सांगण्यात येतं, असा प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ड्युप्लिकेट, ढोंग, नकली आहे त्याचं हिंदुत्व. काल उद्धव ठाकरेंनी हेच सांगितलं, सत्ता हवी असते तेव्हा हिंदू हे आहे ते आहे असं सांगितलं जातं. हिंदू पाकिस्तान, हिंदू मुस्लमान असे विषय सत्तेसाठी चर्चेत आणले जातात. सर्व काही केलं जातं. मात्र जेव्हा काम होतं तेव्हा त्यांना फेकून दिलं जातं. राजकारणामधील गरज पूर्ण झाल्यानंतर दूर लोटायचं ही त्यांची पद्धत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
गोव्यात लक्ष्मीकांत पार्सेकरांचं काय झालं, पर्रीकरांच्या मुलाचं काय झालं आपण पाहिलं असेल. तुम्ही महाराष्ट्रात एकनाथ खडसेंचं काय झालं. मुंडे कुटुंबाचं काय झालं. रामविलास पासवान यांच्या कुटुंबाचं काय झालं संपूर्ण देशानं पाहिलं आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
“आम्हाला आमची ताकद माहितीय. आमचा आत्मविश्वासच आम्हाला पुढे घेऊन चाललाय. आम्हाला टक्कर दिली तर त्याचा परिणाम भोगावे लागतील,” असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, “ईडी असो, सीबीआय असो किंवा केंद्रातील सत्ता असो. आम्हाला तुम्ही चिरडण्याचा प्रयत्न केलात तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही लढण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार आहोत. तुम्हाला हवं ते करुन घ्या,” असं थेट आव्हान भाजपाला दिलं आहे.
नक्की वाचा >> “…तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता”; बाळासाहेबांचा संदर्भ देत संजय राऊतांचं वक्तव्य
“मला असं वाटतं की कालच्या भाषणामधून शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्पष्ट संदेश दिला आहे की शिवसेनेची पावलं आता दिल्लीच्या दिशेने पडत आहेत. देशामध्ये आता आम्हाला विस्तार करायचा आहे. त्यासाठी संघर्ष करण्याची, अडचणींचा सामना करण्याची आमची तयारी आहे. प्रत्येक राज्यामध्ये आम्ही निवडणुका लढवणार आहोत. आज यश येणार नाही पण उद्या येईल हा विश्वास आमच्यात आहे,” असं राऊत म्हणालेत.
“आम्ही गोव्यात लढत आहोत, आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेवलंय. याआधी दादरा नगरहवेलीची लोकसभा आम्ही जिंकलीय. आम्ही दक्षिण गुजरातमध्ये काम सुरु केलं आहे,” असं राष्ट्रीय पातळीवरील शिवसेनेच्या वाटचालीसंदर्भात बोलताना राऊत यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> “तसं पाहिलं तर मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत
“अंगवरती वर्दी असेल तर पोलीस कोणाच्याही अंगावर जातो. बेकायदेशीर काम करतो, असं आपण सिनेमांमध्ये बघितलं असेल. अनेकदा सिनेमांमध्ये आपण वर्दी निकाल के मेरे गली मे आ, असे संवाद ऐकलेत. तशी ही ईडी, सीबीआय. इन्कम टॅक्स हे जे काय आहे ही त्यांची चिलखतं आहे. ही चिलखतं घालून ते राजकीय शत्रूंशी लढत असतात. हिंमत असेल तर ही चिलखतं काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, ना लोळवलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडली. आम्ही त्या भूमिकेशी ठाम आहोत. आम्ही लढण्यास तयार आहोत. या अंगावर. काय करणार आहात तुम्ही? एक तर खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, आयटी सेलचा वापर करुन बदनामीची मोहीम चालवाल किंवा हरेन पंड्याप्रमाणे आम्हाला गोळी माराल. दुसरं तुम्ही काय करु शकता? तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही. हा डाव तुमच्यावर उलटेल आणि तुम्ही संपाल,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.