महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. एकीकडे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ देणार नसल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे आता उत्तर प्रदेशात शिवसेनेने पोस्टरबाजी केलीय. शिवसेनेने लावलेल्या होर्डिंगवर ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असं लिहित नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने लावलेल्या पोस्टरवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावल्याचं दिसत आहे. याशिवाय भगवान श्रीरामांचा फोटो आणि ‘जय श्रीराम’ असंही पोस्टरवर लिहिलेलं आहे. आदित्य ठाकरे १० जुनला अयोध्या दौऱ्यावर जाऊन रामलला यांचे दर्शन घेणार आहेत.

“नकली भावनेतून जाणाऱ्यांना श्रीरामाचा आशिर्वाद मिळत नाही”

दरम्यान, संजय राऊत यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, “अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरु आहे. प्रभू श्रीराम हे एका धर्माचे नाहीत. सर्वांवर त्यांचा आशिर्वाद आहे. पण कोणी नकली भावनेतून किंवा राजकारणासाठी जात असेल तर रामाचा आशिर्वाद मिळत नाही. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. आता आदित्य ठाकरे १० जूनला जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसैनिक आणि युवासैनिक जाणार आहेत.”

हेही वाचा : जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे” – राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांना कडक सूचना!

“उत्तर प्रदेशमध्ये असली नकलीचे बॅनर कोणी लावले त्याची माहिती नाही. पण तिथली जनता सुजाण आहे. त्यांना राजकारण फार चांगले कळते. त्यामुळे एखाद्या दौऱ्यात राजकारण असेल तर लोकांच्या मनातील भावना वेगळ्या आहेत. अशावेळी प्रभू श्रीरामाचीही इच्छा नसते. आम्ही आधीच घोषणा केल्याने १० जूनला आम्ही अयोध्येला जाणार आहोत. हा आमचा राजकीय दौरा नाही आमची श्रद्धा आहे. त्यानुसार तयारी सुरु आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader