शिवसेनेनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचं समर्थन केलं आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर टी-शर्ट आणि इतर मुद्द्यांवरुन टीका करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला शिवसेनेनं लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी मांडत असलेल्या मुद्द्यांवर उत्तरं देण्याऐवजी दुय्यम मुद्द्यांवरुन भाजपा या यात्रेला लक्ष्य करत असल्याने ही ‘कर्तव्यपथा’वरील पोटदुखी असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. तसेच राहुल गांधी ४१ हजारांचा टी-शर्ट घालतात असं म्हणणाऱ्या भाजपाचे लोक गांधीजींप्रमाणे फक्त पंचा नेसून उघडे फिरून राजकारण करतात काय? मंत्रिमंडळात रोज चरख्यावर बसून सूत कताई करून त्याची वस्त्र शिवून हे लोक अंग झाकतात काय? असे प्रश्न शिवसेनेनं विचारले आहेत.

नक्की पाहा >> Video: मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसमोरच ‘बर्निंग कार’चा थरार! भर पावसात शिंदे ताफा थांबवून खाली उतरले अन्…; शिंदेंचे शब्द ऐकून ‘तो’ रडू लागला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपाची पोटदुखी वाढू लागली आहे. डोकेदुखी नैसर्गिक आहे. राजकीय पोटदुखी ही एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून जन्मास येते. पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांतून बाहेर पडतात. भाजपा प्रवक्त्यांनी असे किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ पदयात्रेत जे ‘टी शर्ट’ वापरत आहेत त्याची किंमत ४१ हजार रुपये असल्याची माहिती भाजपा प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

“राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. ‘भारत जोडो’ ही एक चांगली संकल्पना आहे. भारतात कुठे काही मतभेद असतील, मने दुभंगली असतील, कुठे फुटीरतेची बिजे पसरली असतील तर त्यास जोडण्याची जिद्द घेऊन राहुल गांधी बाहेर पडले आहेत. देशभरात मैलोन् मैल ते चालणार आहेत. लोकांशी संवाद साधणार आहेत. याचे स्वागतच व्हायला हवे. पण भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्या ‘टी शर्ट’ची किंमत जाहीर केली. मग भारतीय जनता पक्षाचे लोक गांधीजींप्रमाणे फक्त पंचा नेसून उघडे फिरून राजकारण करतात काय? मंत्रिमंडळात रोज चरख्यावर बसून सूत कताई करून त्याची वस्त्र शिवून हे लोक अंग झाकतात काय? की प्रखर हिंदुत्ववादी वगैरे असल्याने ऋषीमुनींप्रमाणे फक्त वल्कले नेसून मंत्रालयात अथवा पक्ष कार्यालयात जातात?” असे खोचक प्रश्न शिवसेनेनं भाजपाला विचारले आहेत.

नक्की पाहा >> Photos: शिंदे गट- मनसेची जवळीक भाजपाच्या फायद्याची कारण…; BMC निवडणुकीसाठी असा आहे भाजपाचा ‘मास्टर प्लॅन’

“आता राहुल गांधींच्या ‘टी शर्ट’ची किंमत जाहीर करताच जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांचा दहा लाखांचा सूट व सव्वा लाखाचा चष्मा काढला. आणखी बरेच काही बाहेर निघेल. भारतीय जनता पक्षाने राजकारण कोणत्या पातळीवर नेऊन ठेवले आहे?” असा प्रश्नही ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

“‘भारत जोडो’ यात्रेस लोकांची गर्दी होत आहे. राहुल गांधी हे प्रत्येक मुक्कामावर फटकेबाजी करीत आहेत. त्यास उत्तर द्यायला हरकत नाही. पण राहुल गांधी सत्य तेच बोलत आहेत. देश आतापर्यंत सर्वात अधिक आर्थिक संकटात आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी करतात व ‘भारत जोडो’ यात्रा अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे. राहुल गांधी यांनी मांडलेल्या राष्ट्रीय प्रश्नांवर खुलासा करायचे सोडून ते कोणते कपडे घालतात, काय खातात वगैरे पांचट विषय भाजपाकडून समोर आणले जात आहेत. म्हणजेच राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांत ताकद आहे व भाजपावाल्यांची तोंडे बंद पडली आहेत,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “नागपूरला मी कायम ट्रेननेच जातो” म्हणत राज ठाकरेंनी सांगितलं यामागील खास कारण; उत्तर ऐकून पत्रकारांना हसू अनावर

“लोकांत जागृती करण्याचे काम ही यात्रा करीत आहे व तेच भाजपाच्या पोटदुखीचे कारण व आजार आहे. आज देशात स्वातंत्र्य राहिलेले नाही. घराणेशाही परवडली असे वाटावे इतका एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा कहर सुरू आहे. चिदंबरम यांनी प्रखर, पण सहज भाषेत सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘भारत जोडो यात्रा भारताचा दुसरा स्वातंत्र्य लढा आहे. देशातील विभाजनकारी शक्तींचा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’ असा नारा दिला होता. काँग्रेसच्या आजच्या यात्रेवर टीका करणाऱ्या लोकांचा या लढ्यात सहभाग नव्हता.’’ चिदंबरम यांनी जे सांगितले त्यावर भाजपा प्रवक्त्यांनी प्रतिवाद केला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यात व देश घडविण्याच्या प्रक्रियेत आपण खरेच होतो काय, असा प्रश्न ‘भारत जोडो’ यात्रेवर हल्ला करणाऱ्यांनी स्वत:ला एकदा विचारायला पाहिजे. पण असे प्रश्न जे विचारतात त्यांचे शर्ट काय किमतीचे, घड्याळ कोणत्या कंपनीचे, चपला कोणत्या ब्रॅण्डच्या वगैरे वायफळ प्रतिहल्ले केले जात आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे.

“भाजपाकडे विचार वगैरे आहे व इतरांकडे तो नाही असे ते सांगतात. पण मग विचारांचा लढा विचाराने लढायला तुम्ही का घाबरता? देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे व देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे हे खरे की खोटे? देशातील महागाईवर नियंत्रण ठेवणे हे एकट्या केंद्राचे काम नाही, राज्यांचीही जबाबदारी आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांगतात, याचा काय अर्थ घ्यायचा? याचा अर्थ इतकाच की, महागाईबाबत ‘कर्तव्य’पथावरील पोटदुख्यांनी हात झटकले आहेत. देशात वर्षभरात १० हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे सरकारी संस्थांचे आकडे आहेत. राहुल किंवा ममता बॅनर्जी यांचे नाहीत. भाजपाने यावर चर्चा करावी. इतरांच्या अंतर्वस्त्रास हात घालाल तर सगळ्यात आधी तुमच्या कमरेवरचे सुटेल!” असा सूचक इशारा शिवसेनेनं भाजपाला दिला आहे.

“राहुल गांधी त्यांच्या पदयात्रेतून सरकारी मर्जीतल्या दोन-चार उद्योगपतींवर हल्ला करतात. त्याची पोटदुखी भाजपास असू शकते, पण देशातील श्रीमंतांतही वैफल्य आहे. कारण भाजपाच्या अंतस्थ गोटातील मोजक्या लोकांनाच पैसे कमविण्याची मुभा आहे. इतरांनी कमवले तर ते ‘ईडी’चे बळी ठरतील. गरीबांचे तर विचारू नका. ते गरीबच होत आहेत. त्यांच्यासाठी ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ असा नफरती पुलाव आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ पदयात्रा हा नफरती माहोल दुरुस्त करून भारतात स्वच्छ, ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठीच आहे. त्यांनी महागडे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय, फरक पडत नाही. राहुलवरील टीका भाजपास मात्र उघडे पाडीत आहे. ‘कर्तव्यपथा’वरील पोटदुखीने काय साध्य होणार” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena praises rahul gandhi bharat jodo yatra slams bjp scsg