मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून शिवेसना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरुन टोला लगावला आहे. याआधी शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना कधीच सरकार स्थापनेसाठी दिल्लीत आले नसल्याची आठवणही संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना करुन दिली. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नाही, तर भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असंही ते म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सदिच्छा भेटीसाठी दिल्लीत आले होते असं सांगत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.
“मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर ही त्यांची नेहमीची भेट आहे, कारण ते भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड येथे आहे त्यामुळे त्यांना दिल्लीत यावं लागेलं. मंत्रिमंडळ तयार करायचं आहे, मंत्र्यांची यादी करायची आहे. पण मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना कधी मंत्रिमंडळाची यादी किंवा सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचं ऐकलं नाही. त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या,” अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.
“प्रत्येक राज्य आपल्या समस्या घेऊन दिल्लीत येत असतं, त्यासंबंधी टीका करणार नाही. पण जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले असतील तर महाराष्ट्र डोळे वरुन करुन त्यांच्याकडे पाहणार,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.
“उद्यापासून सुप्रीम कोर्टात सरकारच्या भवितव्याचा फैसला कऱणारी सुनावणी होणार आहे. त्याच अस्वस्थेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत. काही प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आजही सुप्रीम कोर्टात रामशास्त्री बाण्याचे काही न्यायाधीश आहेत. त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही, राष्ट्रसेवा होई याची खात्री आहे,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा नेते उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या भेटीचे फोटो व्हायरल करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “उद्धव ठाकरे सरकार स्थापन करण्यासाठी आले नव्हते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून भेटायला आले होते. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही ते भेटले होते. सर्व प्रमुख नेत्यांची भेट त्यांनी घेतली होती. त्यांचे फोटो का व्हायरल करत नाहीत?”.
“महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात पुराची गंभीर स्थिती असून लोकांचे मृत्यू होत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री येथे राजकारण करण्यासाठी, सरकार वाचवण्यासाठी आले आहेत. निवडणूक आयोगाकडे जातील, शिवसेना खासदारांना फोडण्यासाठी भेटतील,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
“आम्ही ही संकटं पहिल्यांदा पाहिलेली नाहीत. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक असतील…पक्षाने मोठं करायचं, ताकद द्यायची आणि नंतर आपला गट घेऊन बाहेर पडायचं हे सगळीकडे होत आहे. एकाच पक्षात होत नाही. राजकारणात आता नितिमत्ता, निष्ठा, वैचारिक बंधनं राहिलेली नाहीत. फुटीरांना प्रोत्साहन देणारं नेतृत्व देशाच्या राजधानीत असेल तर असं घडणारच. श्यामप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी बोलता आणि दुसरीकडे बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्याचं पाप करता. आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत, पण उद्या हे पाप स्वस्थ बसू देणार नाही,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.
दरम्यान नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे असाही दावा करु शकतात अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली आहे. “उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असंही म्हणू शकतात. यांची वैचारिक पातळी इथपर्यंत गेली आहे की, शिवसेना आणि बाळासाहेबांचा संबंध नाही असंही विधान केलं जाऊ शकतं,” अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.