राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसकडूनही उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नव्या राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. विरोधकांकडूनही उमेदवार देण्यास उशीर झाल्याने भाजपा हा प्रयत्न करताना दिसत आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. हा सामना बरोबरीचा होणार असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
“गेल्या काही काळापासून राष्ट्रपती हे सत्ताधारी पक्षातले नेमले जातात. गेल्या काही काळात स्वतत्र्यपणे काम करणारे राष्ट्रपती कमी मिळाले आहेत. आता सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांचे, त्यांच्या हो ला हो म्हणणारे नवीन राष्ट्रपती घेऊन येतील. सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा या देशातील विरोधी पक्ष नेत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही एक प्रक्रिया असते. सगळ्या देशाला मान्य होईल अशा प्रकारची व्यक्ती तिथे बसायला हवी. पण सत्ताधारी पक्षातील एक नेता तिथे पाठवला जातो आणि तो कार्यकर्ता म्हणून बसतो. पण तरीही सगळ्यांना मान्य होईल असे नाव आले तर त्यावर चर्चा,” होईल असे संजय राऊत म्हणाले.
भाजपला राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध का हवी?
“यामध्ये शिवसेना पुढाकार घेणार नाही पण, उद्धव ठाकरेंशी इतर नेतेही चर्चा करत आहेत. त्यामध्ये भाजपाचे वरिष्ठ नेतेही आहेत. शरद पवारांनी ही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती. कदाचित शरद पवारांच्या बाजूने पारडे झुकले असते. आजही भाजपाकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी जे बहुमत लागते ते नाही आहे. शरद पवार या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर अनेक राज्यातून मतदान झाली असते. भाजपाची मदार खासदारांच्या मतांवर आहे आणि त्यांचे मूल्य सर्वाधिक असते. भाजपा फारतर १०० मतांनी पुढे असेल त्यामुळे सामना बरोबरीचा आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
विश्लेषण: राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? काय आहे खासदार, आमदरांच्या मतांचे गणित, घ्या जाणून
दरम्यान, १५ व्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. नवनियुक्त राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया कशी?
* राज्यांचे व दिल्ली तसेच, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील सदस्य व संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. सर्वाधिक मतमूल्य मिळालेल्या उमेदवाराला केंद्रीय निवडणूक आयोग विजयी घोषित करतो.
* लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्यातील आमदाराचे मूल्य ठरते. महाराष्ट्रातील आमदाराचे मूल्य १७५ असून विधानसभेत २८८ सदस्य आहेत. त्यामुळे राज्याचे एकूण मतमूल्य ५०,४०० आहे.
* उत्तर प्रदेशमधील आमदाराचे मूल्य सर्वाधिक २०८ असून राज्याचे एकूण मतमूल्य ८३,८२४ आहे. सर्व राज्यांचे एकूण मतमूल्य ५ लाख ४३ हजार २३१ इतके आहे.
विश्लेषण : लढत राष्ट्रपतीपदाची; कसोटी २०२४ साठी विरोधकांच्या एकजुटीची?
राज्यांच्या मतमूल्यांच्या आधारे संसदेतील सदस्यांचे मतमूल्य ठरते. लोकसभेत ५४३ सदस्य असून राज्यसभेत २३३ सदस्य आहेत. राज्यसभेतील १२ नियुक्त सदस्यांना मतदानात भाग घेता येत नाही.
* दोन्ही सभागृहातील प्रत्येक खासदाराचे मतमूल्य ७०० इतके आहे. त्यामुळे राज्य विधानसभेतील सदस्यांचे मतमूल्य व संसदेतील सदस्यांचे मतमूल्य मिळून राष्ट्रपतीपदासाठी एकूण मतमूल्य १० लाख ८६ हजार ४३१ इतके असेल.
४ हजार ३३ आमदार व ७६६ खासदार मिळून एकूण ४८०९ ‘मतदार’ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतील.