गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अनेक काश्मिरी पंडितांनी जम्मूमध्ये स्थलांतर केलं आहे. काही पंडितांनी काश्मीरमधील परिस्थिती १९९०पेक्षा भयंकर झाली आहे, अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून देशभरात राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधला आहे.
“हे सरकारचं काम आहे का?”
संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून भाजपाला सवाल केला आहे. “काश्मीर पुन्हा एकदा जळतोय. रोज रक्ताने माखतोय. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीये. आणि आपले दिल्लीतले प्रमुख लोक चित्रपटांचं प्रमोशन करत आहेत. कधी कश्मीर फाईल्स, कधी पृथ्वीराच चौहानचं प्रमोशन होत आहे. हे सरकारचं काम आहे का? आणि कश्मिरी पंडितांचा आक्रोश कुणी ऐकायला तयार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“सरकार काय करतंय?”
“कश्मिरी पंडित, मुसलमान बांधव यांचीही हत्या होत आहे. आत्तापर्यंत २० मुस्लीम सुरक्षा अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. कारण ते देशाचं संरक्षण करत होते. कश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मारलं जात आहे. पळवून लावलं जात आहे. पण सरकार काय करतंय?” असा सवाल राऊतांनी केला आहे.
“ईडी आता पंडित नेहरूंनाच नोटीस बजावून…”, संजय राऊतांचं ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी टीकास्त्र!
दरम्यान, केंद्र सरकारला सत्तेत आठ वर्ष झाल्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “आठ वर्ष कसली साजरी करतायत? तिथे काश्मीर रोज हिंदूंच्या रक्तानं भिजून जातोय. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हजारो काश्मिरी पंडित मुलाबाळांना घेऊन पलायन करत आहेत”.
“तुम्ही शिवलिंग काय शोधताय?”
“सरकार भाजपाचं आहे. तुम्ही ताजमहाल, ज्ञानवापी मशिदीच्या खालचं शिवलिंग शोधताय. भाजपाला टीका करायला काय जातंय. काश्मिरी पंडित मरतायत त्याकडे पाहा. त्यावर बोला. टीका कसली करताय? १९९० साली काश्मिरी पंडितांचं हत्याकांड झालं, पलायन झालं तेव्हाही भाजपाच केंद्रात सत्तेत होती. आजही भाजपाच सत्तेत आहे”, असं राऊत म्हणाले.