शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे थोड्याच वेळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राऊत यांनी आज (५ ऑक्टोबर) स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचाच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. त्यातच, उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधींना अटक केली आहे. अशावेळी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असून मी आज याबाबत राहुल गांधी यांची भेट घेईन”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. संध्याकाळी ४.१५ वाजता राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील या भेटीकडे निश्चितच लक्ष राहणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे.
“लखीमपूर खेरीमधील दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधी यांनाही अटक केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखलं जात आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेशातील सरकारच्या दडपशाहीविरोधात विरोधकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. मी दुपारी ४.१५ वाजता राहुल गांधी यांची भेट घेईन. जय हिंद”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, लखीमपूर घटनेनंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी (४ ऑक्टोबर) ताब्यात घेऊन सीतापूरमधील विश्रामगृहात ठेवलं होतं. पण आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले त्या विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारण्यात आलं आहे.
“तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का?”
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या लखनऊ दौऱ्यापूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. “तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का?” असं विचारताना प्रियांका त्यांनी आपल्या मोबाईलमधला एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, शांतपणे चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट अंगावर गाडी घातली गेली. दरम्यान, प्रियांका गांधींनी हा व्हिडीओ लखीमपूर खेरीचा असल्याचा दावा केला आहे. पुढे सवाल करत प्रियांका म्हणाल्या, “या माणसाला अटक का केली गेली नाही? लखीमपूर खेरीला भेट द्यायची आहे अशा आमच्यासारख्या नेत्यांना कोणत्याही एफआयआरशिवाय ताब्यात घेण्यात आलं आहे. मग, मला हे जाणून घ्यायचं आहे की हा माणूस मुक्त का आहे?”
“मोदीजी लखीमपूर खेरीला जाणार आहात ना?”
लखनऊ दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बोचरा सवाल केला आहे.
“मोजीदी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी येत आहेत. आपल्याला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं? शेतकऱ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. लखनऊमध्ये हा कार्यक्रम घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या मंत्र्याला पदावरुन दूर करत त्याला मुलाला अटक का करत नाही ? हा नेता पदावर कायम राहिला तर सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीय,” अशा शब्दांमध्ये प्रियंका यांनी आपला संताप व्यक्त केला. त्याचसोबत, “मोदीजी तुम्ही लखीमपूर खेरीला जाणार आहात ना?”, असा प्रश्नही प्रियंका यांनी केला आहे,