जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात रविवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये रामनवमीनिमित्त होमहवन आणि खानावळीतील मांसाहारी पदार्थाचे सेवन या मुद्दय़ांवरून हिंसक संघर्ष झाला, त्यात १६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. याच मुद्द्यावरुन आज शिवसेनेनं सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे.

देशाचे तुकडे तुकडे होतील असे वातावरण…
“भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू आहे हे आता स्पष्टच झाले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यापासून दंगली घडविण्यापर्यंत या मंडळींचा हातभार असतो हा संशय गडद होत आहे. एका बाजूला अखंड भारताचे गिरमिट चालवायचे व दुसऱ्या बाजूला धर्मांध तेढ निर्माण करून देशाचे तुकडे तुकडे होतील असे वातावरण निर्माण करायचे याला हिंदुत्व किंवा हिंदू संस्कृती म्हणता येणार नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

बेरोजगारांचे लक्ष दुसरीकडे वळवीत आहेत
“‘भाजपा म्हणजे हिंदुत्व नव्हे. आम्ही भाजपाला सोडले, हिंदुत्वाला नव्हे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा म्हणाले आहेत ते यामुळेच. भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाशी घेणेदेणे नसून हिंदू-मुसलमानांत सदैव झगडा, त्यातून तणाव आणि अस्थिरता, त्याच तणावात हिंदू भावनांना हात घालून निवडणुका जिंकायच्या यापलीकडे यांच्या हिंदुत्वाची मजल नाही. त्याचे ताजे रटरटीत उदाहरण म्हणजे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहारी जेवणावरून भाजपाच्या विद्यार्थी संघटनेने केलेली हिंसा व राडा. विद्यापीठाच्या कावेरी वसतिगृहाच्या खाणावळीत रविवारी मांसाहारी जेवण तयार केले जाते. त्या मांसाहारी जेवणास हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या भाजपाच्या ‘अभाविप’ने विरोध केला. तो दिवस रामनवमीचा होता. त्यामुळे मांसाहार वर्ज्य असे या लोकांचे सांगणे आहे. काय खावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असला तरी भाजपाच्या नवहिंदुत्ववाद्यांनी ‘खाण्या’वरून याआधी देशभरात हिंसा घडवली आहे. भाजपाचे लोक रोजगार, महागाईवर बोलत नाहीत. मांसाहारासारख्या विषयावरून ते बेरोजगारांचे लक्ष दुसरीकडे वळवीत आहेत,” असा आरोप शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केलाय.

राजकीय मुद्दे शाळा-कॉलेजात नेता कामा नयेत
“धर्म ही अफूचीच गोळी आहे, याचे प्रत्यंतर भारतात रोजच येत आहे. ‘जेएनयू’त हिंसा मांसाहारावरून झाली, पण भाजपावाले रामनामास बदनाम करीत आहेत. वादात रामाला ओढत आहेत. विद्यापीठातील डाव्यांनी म्हणे रामनवमीच्या पूजेस विरोध केल्याने वाद झाला. हे खोटे आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या काळात ‘हिजाब’ वाद निर्माण केला गेला व हिंदू भावनांना हात घातला. हिजाब प्रकरणातील एक सत्य मान्य करावेच लागेल की, कोणत्याही शैक्षणिक संस्थेत गणवेश ठरलेला असतो व तो नियम पाळायलाच हवा. धार्मिक तसेच राजकीय मुद्दे शाळा-कॉलेजात नेता कामा नयेत, पण हे वाद उकरून काढायचे काम सध्या भाजपापुरस्कृत नवहिंदुत्ववादी करीत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

मंदिर परिसरात दुकाने लावण्यास मुसलमानांना विरोध
“हिजाबपाठोपाठ आता मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराचे प्रकरण समोर आले आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या परिसरात मुसलमानांची दुकाने लावू द्यायची नाहीत, त्यांना व्यवसाय करू द्यायचा नाही अशी मोहीम आता भाजपाच्या नवहिंदुत्ववाद्यांकडून राबवली जात आहे. अनेक धार्मिक स्थळी वर्षानुवर्षे मुस्लिम व्यावसायिक मंदिरात लागणारी पूजा सामग्री विकण्याचा व्यवसाय करतात. हीच आपली सहिष्णुता आहे. फुले, फळ, उदबत्त्या, कापूर अशा व्यवसायात हे लोक पिढ्या अन् पिढ्या आहेत. या सर्व मुस्लिम व्यावसायिकांना राम सेना, हिंदू सेना म्हणवून घेणाऱ्यांनी विरोध केला. कर्नाटकात मुस्लिम व्यावसायिकांची फळांची दुकाने तर मोडून तोडून टाकली. मंगळुरातील मंगलादेवी मंदिर, बप्पनडू दुर्गापरमेश्वरी मंदिर, कटिपल्ला गणेशपुरा, श्री महागणपती मंदिर, पुत्तूर श्री महालिंगेश्वर मंदिर परिसरात दुकाने लावण्यास मुसलमानांना विरोध केला आहे,” असा उल्लेख या लेखात आहे.

भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवल्याने चिनी सैन्य मागे हटणार असेल तर…
“कर्नाटकात भविष्यात निवडणुका आहेत. त्याची तयारी ही अशा पद्धतीने सुरू झाली आहे. हिंदू-मुसलमानशिवाय भाजपाकडे दुसरा कार्यक्रम नाही. तिकडे चीनचे सैन्य गलवान व्हॅलीत घुसून बसले आहे. तेथे हिंदुत्वाची गर्जना फिकी पडत आहे. मुंबईत मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालिसाचे पठण केल्याने चिनी सैन्य मागे हटणार असेल तर आनंदच आहे. मशिदी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करून आपणच कसे हिंदुत्ववादी आहोत याचे प्रदर्शन केल्याने कश्मीरातील हिंदू पंडितांचा प्रश्न मार्गी लागणार आहे काय? पंडितांची घरवापसी होणार आहे काय? बेरोजगार हिंदू पोरांना रोजगार मिळणार आहे काय? पाकव्याप्त कश्मीर भारताच्या नकाशावर येणार आहे काय? याची उत्तरे मिळायला हवीत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नवहिंदुत्ववादी उन्मत्त लोकांना याची चिंता वाटेल काय?
“भाजपाचे नवहिंदुत्ववादी देशात ‘फाळणीपूर्व’ परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजात धार्मिक द्वेषभावना रुजविण्यासाठी एका शतकाची रणनीती आखली असावी अशी भीती डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. बंग यांचे म्हणणे असे की, संघाने स्थापनेनंतरच्या काळात कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते त्यांना अपेक्षित समाजमन घडविण्याचे काम करीत होते. यासाठी त्यांनी शिक्षण, विविध संस्था, साहित्य, नाटक व इतर साधनांचा वापर केला. डॉ. बंग यांनी जे विचार व्यक्त केले ते ‘जेएनयू’पासून कर्नाटकपर्यंत खरे होताना दिसत आहेत. धार्मिक द्वेषाचे राजकारण देशाचे पुन्हा तुकडे तुकडे करील. बालमनावर रुजवलेले द्वेषाचे बीज ही पिढी संपल्यावरच संपेल, असे डॉ. बंग सांगतात. त्याआधी असंख्य फाळण्यांची बीजे रुजलेली असतील. नवहिंदुत्ववादी उन्मत्त लोकांना याची चिंता वाटेल काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

Story img Loader