महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाने पुन्हा तोंड वर काढलं आहे. मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाजूने दावे-प्रतिदावे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच मुद्द्यावरुन केंद्राबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला राज्यातील महाविकास आघाडीकडून लक्ष्य केलं जात आहे. असं असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चीनचा एजंट असा उल्लेख केला. या टीकेला आता शिवसेनेनं थेट ‘सामना’मधून उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची आठवण बोम्मईंना करुन दिली आहे.
कर्नाटक सरकारने विधानसभेत सीमाप्रश्नासंदर्भातील वाद हा महाराष्ट्राने निर्माण केल्याचं म्हणत या वादाचा निषेध ठराव मांडला व मंजूर करून घेतल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर शिवसेनेनं आगपाखड केली आहे. बोम्मई यांना ‘मिटवायचे नसून पेटवायचे आहे’ असं म्हणत शिवसेनेनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीचाही मान बोम्मईंनी ठेवा नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते (बोम्मई) महाराष्ट्राच्या नावाने कडाकडा बोटे मोडत राहिले व केंद्रीय गृहमंत्री शहांनी चर्चेस बोलावले तेव्हा, ‘‘ते ट्विटर अकाऊंट माझे नाहीच. त्यावर कोण काय लिहिते त्याच्याशी आपला संबंध नाही,’’ अशा प्रकारची भूमिका घेतली. हा एक विनोदच म्हणावा लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे लोक दिल्लीत सीमाप्रश्नी बैठकीसाठी गेले तेव्हा फक्त पंधरा मिनिटांत हारतुरे, स्वागत, फेटा बांधणे व चर्चा असे सोपस्कार आटोपून दोन्ही राज्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी असे ठरले, पण दिल्लीतून कर्नाटकात पाऊल टाकताच बोम्मई यांनी शब्द फिरवला व पुन्हा तोच मृदंग एकाच बाजूला वाजवायला सुरुवात केली. आता त्यांनी कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राने निर्माण केलेल्या वादाचा निषेध ठराव मांडला व मंजूर करून घेतला. अशा निषेध ठरावाची गरज होती काय?” असा प्रश्न विचारत बोम्मईंना शिवसेनेनं लक्ष्य केलं आहे.
नक्की वाचा >> “बोम्मईंना वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे?” शिवसेनेचा सवाल; शिंदे सरकारला लक्ष्य करत म्हणाले, “…तर निर्लज्जपणाची हद्दच झाली”
तसेच पुढे संजय राऊत यांना चिनी एजंट म्हटल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं बोम्मईंना सुनावलं आहे. “गृहमंत्री अमित शहांची मध्यस्थीदेखील आता त्यांनी झुगारून लावली व पुन्हा कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राचा निषेध करणारा ठराव मंजूर करून घेतला. याचा अर्थ त्यांना मिटवायचे नसून पेटवायचे आहे. महाराष्ट्रातील नेत्यांवर त्यांनी आरोप केले. संजय राऊत हे चीनचे एजंट व देशद्रोही आहेत, जयंत पाटील यांना संस्कृती नाही, असे बोलून ते काय साध्य करू इच्छितात? चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत खास पाहुणे म्हणून बोलावून त्यांना ढोकळा-गाठिया खाऊ घालणारे, झोपाळ्यावर झुलविणारे कोण होते? आपले पंतप्रधान मोदीच होते ना? मग त्यांना बोम्मई कोणती उपाधी देतील?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
नक्की वाचा >> “बिल क्लिंटनही विचारतात Who is Eknath Shinde? केवढं काम करतो! कधी झोपतो? कधी…”; CM शिंदेंचा पत्रकारांसमोर दावा
“चीनला भारतात घुसण्याची संधी देणारे तुमचेच लोक आहेत. त्यामुळे चिनी एजंट कोण हे एकदा ठरवा. लडाख व अरुणाचलमध्ये चीन घुसला. चीन जगभरात ज्या पद्धतीने सर्वत्र घुसखोरी करीत आहे त्याच पद्धतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई बेळगाव गिळू पाहत आहेत. सांगली, सोलापुरात घुसण्याची भाषा करीत आहेत. त्यांच्या घुसखोरीस त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांत ‘ठोक’ उत्तर देण्याची हिंमत नसल्याने जनतेला ‘मऱ्हाठी’ बाणा दाखवावा लागत आहे. मऱ्हाठा एक तर उठत नाही व उठला तर बसत नाही, हे बोम्मई यांनी समजून वागले पाहिजे,” चीन आणि घुसखोरीचा संदर्भ देत शिवसेनेनं थेट इशाराच बोम्मई आणि पर्यायाने भाजपाला दिला आहे.