शिवसेनेनं जम्मू-काश्मीरमधील सरकारी शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकरणावरुन केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला लक्ष्य केलं आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधीच शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. काश्मीरच्या खोऱ्यात सरकारी नोकरीत असलेल्या ५७ काश्मीर पंडितांची यादी दहशतवादी संघटनेनं जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे.
“देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्राणपणाने व्यूहरचना आखण्यात मश्गूल असतानाच जम्मू-कश्मीरात मात्र पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे कट-कारस्थान रचल्याची भयंकर बातमी आहे. इकडे केंद्रातील सत्तापक्ष गुजरातच्या प्रचारसभांत, निवडणुकीच्या जोड-तोडीपासून रोड शोपर्यंतचे सूक्ष्म नियोजन करण्यात गुंतला असतानाच तिकडे कश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या ५७ कश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची गोपनीय यादीच दहशतवाद्यांनी आपल्या वेबसाईटवर जाहीर केली आहे. एका अर्थाने ही माहिती फोडून अतिरेक्यांनी कश्मिरी पंडितांची हिटलिस्टच जाहीर केली आहे. कश्मीर खोरे तत्काळ सोडा; अन्यथा टार्गेट किलिंग करू, अशी खुलेआम धमकीच या अतिरेक्यांनी कश्मिरी पंडित-कर्मचाऱ्यांना दिली आहे. मुळात ही यादी अतिरेक्यांपर्यंत पोहोचलीच कशी? केंद्र सरकार व जम्मू-कश्मीर प्रशासनाला याचा जाब द्यावाच लागेल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत कश्मिरी पंडितांना खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडितांची वेचून हत्या केली जात आहे. शिक्षक, बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या सातत्याने सुरू असलेल्या ‘टार्गेट किलिंग’मुळे कश्मिरी पंडितांमध्ये आधीच भय व दहशतीचे वातावरण आहे. त्यात लष्कर-ए-तोयबासोबत काम करणाऱ्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या अतिरेकी संघटनेने कश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या पंडित कर्मचाऱ्यांची यादीच जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे. यापैकी बहुतांश जण खोऱ्यात शिक्षक म्हणून काम करतात. टीआरएफ या अतिरेकी संघटनेचा ‘कश्मीर फाईट’ नावाचा ब्लॉग असून, ते या पाक अतिरेकी संघटनेची अधिकृत भूमिका जाहीर करणारे मुखपत्र मानले जाते. टीआरएफने कश्मिरी पंडितांना धमकावणाऱ्या या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ‘कश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या सर्व ५७ कश्मिरी पंडितांची हिटलिस्ट आमच्याकडे आहे, त्यांनी तातडीने खोरे सोडावे; अन्यथा त्यांना इथे राहण्याचे गंभीर परिणाम भोगवे लागतील.’ हे कश्मिरी पंडित कोणत्या गावात, शहरात, कोणत्या शाळेत वा सरकारी कार्यालयांत काम करतात, याची सविस्तर माहिती अतिरेक्यांनी प्रत्येकाच्या नावासह जाहीर केली आहे. पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत कश्मीर खोऱ्यात १९ ठिकाणी कश्मिरी पंडितांसाठी सहा हजार फ्लॅटस् उभारण्याचे जे काम सुरू आहे, ते आम्हाला कदापि मान्य नाही. या फ्लॅटस्चा स्वीकार कश्मिरी पंडितांनी करू नये आणि याउपरही पंडितांनी ही घरे घेतलीच तर त्या सर्वांची नावेही आम्ही जाहीर करू, अशी थेट धमकीच या पाकिस्तानी संघटनेने दिली आहे,” असंही सामनाच्या अग्रलेखामध्ये हा विषय अधोरेखित करताना म्हटलं आहे.
“अतिरेक्यांच्या हिटलिस्टमधील आपली नावे वाचून कश्मिरी पंडितांमध्ये साहजिकच घबराट पसरली आहे. खोऱ्यामध्ये आमचा जीव सुरक्षित नाही, त्यामुळे आम्हाला खोऱ्यात नेमणुका नको, तर जम्मू विभागात बदल्या करा, या मागणीसाठी पंडित-कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या वर्षभरात २४ कश्मिरी पंडित आणि बिगर कश्मिरी नागरिकांची अतिरेक्यांनी हत्या केली आहे. त्यात आता ‘टीआरएफ’ या पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडित असलेल्या ५७ कर्मचाऱ्यांची हिटलिस्ट जाहीर करावी, हे धक्कादायक आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“१९९० च्या दशकात अतिरेक्यांनी जसे दहशतीचे वातावरण निर्माण करून हजारो पंडितांना कश्मीर सोडायला भाग पाडले, त्याच दिशेने पुन्हा कश्मीरची वाटचाल सुरू झाली असेल तर तो राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. ३७९ कलम रद्द केल्यानंतर कश्मीरात सारे काही आलबेल होईल, असा शब्द मोदी सरकारने दिला होता, त्याचे काय झाले? गुजरातच्या निवडणुका संपल्या आहेत. आता तरी केंद्रातील सत्तापक्ष ‘इलेक्शन फिव्हर’मधून बाहेर पडून कश्मिरी पंडित आणि देशावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी वेळ काढेल काय?” असा प्रश्न लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.