आधुनिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्यानिमित्ताने पूजाअर्चा, व्रत, अनुष्ठाने करीत आहेत, उपवास करीत आहेत. पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, ते गंमतीचे आहे. अयोध्येत यानिमित्ताने नवे ‘मोदी रामायण’ निर्माण झाले, ते संपूर्ण राजकीय आहे. श्रीरामाच्या जीवन, चारित्र्याशी, रामराज्याशी, सत्य मार्गाशी, संयम आणि शौर्याशी या ‘मोदी-रामायणा’चा संबंध नाही. त्यांचे रामायण त्यांच्यापाशी, असा टोला शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
“अयोध्या पुन्हा सजली आहे, झगमगली आहे. दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. १४ वर्षाच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येस परतले तेव्हा त्यांची ही नगरी अशीच झगमगून आपल्या राजाच्या स्वागतास सज्ज झाली होती. राम १४ वर्षानंतर परतले तेव्हा त्यांचा महाल, गल्ल्या, रस्ते आनंदाच्या वर्षावाने न्हाऊन निघाले होते. मंगल गाण्यांनी संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. दिवे-पणत्यांनी नगराचा कोपरान्कोपरा उजळून निघाला होता. अप्सरा जाईजुई, पारिजात, गुलाब पाकळ्यांची उधळण करीत होत्या. भरताच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अयोध्येने श्रीरामांच्या स्वागतात कोणतीच कसर सोडली नव्हती. आज भगवान राम हे तंबूच्या वनवासातून भव्य मंदिरात विराजमान होताना संपूर्ण अयोध्या पुन्हा तशीच उजळून निघाली आहे,” असं ठाकरे गटानं म्हटलं.
“भाजपाचे लढवय्ये भीष्म लालकृष्ण आडवाणी कोठे आहेत?”
“रामजन्म मुक्तीसाठी लाखो करसेवक १९९२ साली अयोध्येत जमले. ते सरळ वादग्रस्त घुमटावर चढले. छिन्नी-हातोड्यांच्या घणांनी ते घुमटच तोडून त्यांनी श्रीरामास मुक्त केले. त्या एका घटनेने देशाचे राजकारणच बदलले. हिंदुत्वाची वावटळ उठली. त्यात भाजपासह शिवसेनेचे राजकारण देशभरात पसरले. त्याआधी लालकृष्ण आडवाणी यांनी ‘रामरथयात्रा’ काढली, देशात आंदोलनाचे वातावरण निर्माण केले. राजकारणाचे वारेच त्यामुळे पूर्णपणे फिरले. देशात हिंदुत्वाचे नवचैतन्य निर्माण झाले व श्रीराम त्या परिवर्तनाचे प्रतीक बनले. लालकृष्ण आडवाणी यांनी रामरथावर स्वार होऊन संसदेतला दोन सदस्यांचा भाजपा तेव्हा ८५ खासदारांपर्यंत नेला. पुढे त्याच भाजपाने आजचा पल्ला गाठला तो आडवाणी व त्यांच्या तेव्हाच्या सहकाऱ्यांच्या योगदानामुळे. अयोध्या आज चैतन्याने उजळून निघाली असताना भारतीय जनता पक्षाचे ते लढवय्ये भीष्म लालकृष्ण आडवाणी कोठे आहेत?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“…अन् हे वक्तव्य म्हणजे पळपुटेपणा व जबाबदारी झटकण्याचा प्रकार”
“बाबरीचा ढाचा कोसळला तेव्हा अयोध्येत आणि जगभरात एकच हाहाकार उडाला, अयोध्येच्या रणावर उद्रेकाचा सागर खवळला होता व त्या हिंदू सागराचे नियंत्रण करण्याची हिंमत कोणात नव्हती. बाबरी पाडली जाईल असे तेव्हा कुणालाच वाटले नव्हते, पण हिंदुत्वाच्या त्या तुफान लाटेत बाबरी कोसळली. त्याची जबाबदारी घ्यायला भाजपाने नकार दिला. अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी या नेत्यांनी बाबरी पडल्याबद्दल शोक व्यक्त केला. भाजपाचे उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी पक्षातर्फे अधिकृत भूमिका जाहीर केली ती धक्कादायक होती, “भारतीय जनता पक्षाचा बाबरी पतनाशी संबंध नाही. आम्हाला दुख झाले आहे, हे काम शिवसैनिकांनी केले असावे.” हे वक्तव्य म्हणजे पळपुटेपणा व जबाबदारी झटकण्याचा प्रकार होता, लोकांत निराशा पसरली. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर तेजस्वी वाणी कडाडली, ‘होय, मला अभिमान आणि गर्व आहे त्या शिवसैनिकांचा, ज्यांनी अयोध्येत हे अचाट कार्य केले.’ अयोध्येतील प्रदीर्घ बंदीवासातून अखेर भगवान श्रीराम मुक्त झाले,” असं ठाकरे गट म्हणाला.
“भाजपा आजही श्रीरामाचे खातो, पण…”
“बदला म्हणून मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिका घडवून शेकडो बळी घेतले गेले. दंगलीच्या वणव्यात पाकड्या अतिरेक्यांशी लढण्याचे व मुंबईचे रक्षण करण्याचे शौर्यही शिवसैनिकांनीच दाखवले. हिंदू म्हणून शिवसैनिकांनी गुजराती, उत्तर भारतीय, जैन, मराठी अशा सगळयांच्याच रक्षणाची जबाबदारी तेव्हा पार पाडली. अयोध्या प्रकरणानंतर सगळयात जास्त घाव मुंबईने झेलले हे विसरता येणार नाही. हिंदुत्वाची आग महाराष्ट्राने पेटवली व त्याचा वणवा देशात पेटला. आजचा भाजपा तेव्हा कोठेच नव्हता. मुंबईच्या दंगलीत तर आज फुरफुरणारी त्यांची मंडळी बिळातच होती. हिंदुत्व रक्षणासाठी बळी पडले ते शिवसैनिक. अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचे हे योगदान प्रसाद म्हणून श्रीरामाच्या चरणी रुजू झालेच आहे. भारतीय जनता पक्ष आजही श्रीरामाचेच खातो, पण रामाचा विचार, रामराज्य मात्र वाऱ्यावर आहे,” अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
“अयोध्येतील राम राज्यावर आज भाजपाच्या फौजांनी ताबा घेतला”
“सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीचा खटला चालला व अयोध्येचा निवाडा न्यायालयाने केला. नोव्हेंबर २०१९ सालात सुप्रीम कोर्टाने रामप्रभूच्या बाजूने निकाल दिला. २.७७ एकर वादग्रस्त जमीन हिंदू पक्षकारांना मिळाली. मशिदीसाठी वेगळी पाच एकर जागा देण्याचा आदेश झाला. त्यानंतर तब्बल २८ वर्षानंतर श्रीरामप्रभू त्या तंबूतून बाहेर पडले व फायबरच्या मंदिरात विराजमान झाले. ऑगस्ट २०२० साली राममंदिराचे भूमिपूजन झाले व आज भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा भाग्याचा, गौरवाचा दिवस आहे. अयोध्या हे रामाचे राज्य, पण त्या राज्यावर आज भाजपाच्या फौजांनी ताबा घेतला व त्याला २०२४ च्या निवडणुकांचे रणमैदान केले. यानिमित्ताने भाजपाच्या लोकांनी देशभरात वातावरण निर्मिती केली, जणू वाल्मिकीचे, तुलसीचे, कबीराचे, कम्ब रामायण खरे नसून मोदी हेच नव्या रामायणाचे निमति आहेत,” असं टोमणाही ठाकरे गटानं लगावला आहे.