राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ने पहिल्या दहा दिवसांतच भाजपाच्या तंबूत घबराट निर्माण केली आहे. त्यामुळेच रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या यात्रेवरील मार्गात आसाममधील भाजपा सरकारकडून दररोज काट पेरण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे केंद्र सरकार घाबरले आहे, हेच सत्य आहे व सरकार घाबरले नसेल तर या यात्रेवर हल्ले का सुरू आहेत? स्वतःला महाशक्ती म्हणवणाऱ्या भ्याड सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर आहे काय? असा सवाल शिवसेनेनं ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘सामना’ अग्रलेखातून भाजपाला उपस्थित केला आहे.
“अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो ‘रावणराज्या’चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर ज्या पद्धतीने सरकारपुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला ‘रावणराज्य’ नाही तर काय म्हणायचे?” असा प्रश्नही ठाकरे गटानं विचारला आहे.
“सरमांनी काँग्रेस सोडली व ‘कमळछाप’ साबणाने आंघोळ केली”
“राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच सातत्याने अपशकुन करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यानं सुरू आहेत. मणिपुरातून आसामात पोहोचल्यापासून रोज कुठे ना कुठे ‘न्याय यात्रे’वर हल्ले सुरू आहेत. मात्र, राहुल गांधीही तेवढ्याच हिमतीने आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे न्याय यात्रेतील सभांतून वेशीवर टांगत आहेत. राहुल गांधी यांनी आसामात पाय ठेवल्यापासून भाजपाचे कार्यकर्ते न्याय यात्रेच्या काफिल्यासमोर ठिकठिकाणी अडथळे निर्माण करीत आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेने आसामात प्रवेश करण्यापूर्वीच मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची व अटक करण्याची धमकी दिली होती. वास्तविक हे मुख्यमंत्री सरमा मूळ काँग्रेसचेच, पण आपल्याकडच्या मिंध्यांप्रमाणे तिकडे सीबीआयने शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी धाडी घालून गुन्हे दाखल करताच त्यांनी काँग्रेस सोडली व ‘कमळछाप’ साबणाने आंघोळ केली. त्यामुळे ‘शुद्ध’ झालेल्या सरमा यांना भाजपाने थेट इकडच्या मिध्यांप्रमाणेच आसामचे मुख्यमंत्री केले,” अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
“कुठे राहुल गांधींची गाडी रोखली, कुठ काफिल्यावर हल्ला, तर कुठे…”
“बाटगा अधिक जोरात बांग देतो, असे म्हणतात त्याप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री काँग्रेसच्या न्याय यात्रेत अडथळा आणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. कधी राहुल गांधींची गाडी रोखली जात आहे, कुठे न्याय यात्रेच्या काफिल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो आहे, कुठे राहुल गांधींना जाहीर सभा घेण्यास मज्जाव केला जात आहे, तर कुठे मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. मंदिर प्रशासनाचे निमंत्रण असतानाही पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे राहुल गांधींना रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करावे लागले. या देशात केवळ एकाच व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे व तो चुकीचा नाही,” असं ठाकरे गटानं म्हटलं.
“भाजपाने दुसऱ्या यात्रेचा जबर धसका घेतला”
“लोकशाहीची मुस्कटदाबी करणाऱ्या अहंकारी राजाची ही अन्यायकारी राजवट ‘रामराज्या’च्या कुठल्या संकल्पनेत बसते? २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता काही महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व रावणराज्याचा पर्दाफाश करण्यासाठीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. तणावग्रस्त मणिपुरातून सुरू झालेल्या या न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. बस प्रवास आणि पायपीट करत तब्बल ६६ दिवस चालणारी ही न्याय यात्रा एकंदर १५ राज्यांतील १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघ पालथे घालत ६ हजार ७०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो यात्रेला प्रत्येक राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता भाजपाने या दुसऱ्या यात्रेचा जबर धसका घेतला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेमुळे आम्हाला काडीचाही फरक पडणार नाही,’ असा दावा भाजपाने या यात्रेच्या प्रारंभी केला होता. तथापि, आसामात न्याय यात्रेवर लागोपाठ झालेले हल्ले पाहता भाजपाचा हा दावा किती प्रश्न आहे, हेच स्पष्ट होते,” असा हल्लाबोलही ठाकरे गटानं केला आहे.