नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा दिल्लीमध्ये पार पडला. रविवारी साष्टांग दंडवत घालत आणि विधीवत पूजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना नव्या संसद भवनात प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं गेलं नसल्याने काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला. या सोहळ्याला वादाची किनार लाभली. आता सामनाच्या अग्रलेखातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
माणसाच्या स्वभावाला औषध नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असेच का वागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट कुणीही घेऊ नयेत. नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरुपात पार पडलं. हा सोहळा म्हणजे ‘सबकुछ मोदी’ असाच होता. फोटो आणि चित्रीकरणात इतर कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. तो त्यांचा स्वभाव आहे. राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले असते, त्यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, दोघांच्या मधोमध पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या उजव्या बाजूला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे असे चित्र लोकशाहीच्या मंदिरात दिसले असते तर मोदींचे मोठेपण कमी झाले नसते. मोदींनी हे सर्व घडवून आणले असते तर मोदी बदलले असेच जगाला वाटले असते, पण आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले? मोदी हे मोदींसारखेच वागतात.
राष्ट्रपती नाहीत, उपराष्ट्रपती नाहीत, विरोधी पक्षनेते नाहीत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नाइलाजाने बाजूला ठेवले. नव्या संसदेचे उद्घाटन होत आहे हो.. अशी निमंत्रणाची हाळी मारण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून ओम बिर्ला साहेब होते. असा एकंदरीत कारभार आहे. मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्वतःच जाहीर केले होते की देशाचे संविधान हाच एक पवित्र ग्रंथ आहे. त्या पवित्र ग्रंथाचा आदर आमचं सरकार करेल. मोदींनी त्यावेळी संसदेत प्रवेश करत असताना अत्यंत भावूक होत पायरीवर डोके टेकवून अश्रू ढाळले. त्याच संसदेस आठ वर्षात त्यांनी टाळे ठोकले आणि आपल्या मर्जीने संसदेची नवी इमारत उभी केली. एखाद्या महाराजाने आपल्या राजमहालाचा वास्तुप्रवेश करावा तसा त्याच्या उद्घाटनाचा सोहळा केला.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते सगळे अदृश्य होते. मग त्या उद्घाटन सोहळ्यास कोण उपस्थित होते? नव्या संसद भवनाच्या सोहळ्यात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांड यांना महत्त्व देणाऱ्यांचा भरणा होता. राजदंडही आता आला, म्हणजे यापुढे एकप्रकारे राजेशाहीची सुरुवात झाली. दिल्लीत लोकशाहीच्या नावाखाली नव्या बादशाहीचा राजदंड पोहचला आहे. विज्ञान, संशोधन न मानणाऱ्या लोकांच्या गराड्यात मोदी आले, त्यांनी धर्मकांड केले. यास हिंदुत्व म्हणाले की राज्याभिषेकाचा सोहळा? हिंदुत्वात श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. भारतीय संसदेचे हे कोणते रुप आपण जगाला दाखवत आहोत? राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, पण असंख्य साधू आणि मठाधीशांना संसद महालाच्या वास्तुशांतीस बोलवण्यात आले. एक हजार कोटींचा महाल, लहरी राज्या इच्छेखातर बनवण्यात आला आणि त्यातून लोकशाहीच हद्दपार झाली अशी नोंद इतिहासात होईल.