काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केम्ब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणामुळे देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधींनी त्यांच्या मोबाईलमध्ये पेगासस टाकून फोन टॅप केले जात असल्याचा आरोप केल्यामुळे त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी थेट पंतप्रथांना पाठवलेल्या पत्रात लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे देशाचा प्रवास चालू असल्याचं नमूद केलं आहे. यावर आता ठाकरे गटाकडून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर कठोर शब्दांत हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच, विरोधकांनाही आवाहन केलं आहे.
“राजकारणासाठी उभा जन्म पडला आहे, आधी..”
“विरोधी पक्षांतील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. यामध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, सुवेंदू अधिकारी, मुकुल रॉय, नारायण राणे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह देशात भाजपच्या ‘भ्रष्टाचार वॉशिंग मशीन’च्या विरोधात ठामपणे उभे राहायची हीच वेळ आहे. राजकारणासाठी उभा जन्म पडला आहे. देश आधी वाचवू या”, असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.
“राहुल गांधी यांचे केंब्रिज विद्यापीठातले भाषण सध्या गाजते आहे. गांधी यांच्या फोनमध्ये ‘पेगॅसस’ सोडून त्यांचे फोन ऐकले जात होते. या सगळ्याचा स्फोट राहुल गांधी यांनी केंब्रिज येथे केला. त्यामुळे देशाची बदनामी झाल्याचा ‘राग’ भाजपच्या पोपटरावांनी आळवला. मग नरेंद्र मोदी आतापर्यंत विदेशात जाऊन पंडित नेहरूंपासून इंदिराजी, राजीव गांधी व त्यांच्या सरकारबाबत जी मुक्ताफळे उधळत होते ती देशाची बदनामी नव्हती तर काय होते?” असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
“मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, पण तुम्ही…”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र
‘भाजपच्या मनमानीस दिलेली ही चपराक आहे”
“कालपर्यंत स्वायत्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक सरकारी यंत्रणांचे भाजपने खासगीकरण करून टाकले आहे. हा धोका अल कायदा, तालिबानपेक्षा भयंकर आहे. निवडणूक आयोग तर भाजपच्या ताटाखालचे मांजर होऊन सत्ताधाऱ्यांच्या दारात शेपटी हलवत बसला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयास निवडणूक आयोगाच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावा लागला व मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली. भाजपच्या मनमानीस दिलेली ही चपराक आहे”, अशा शब्दांत ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून टीकास्र सोडण्यात आलं आहे.
“इतके मोठे ‘कॅशकांड’ होऊनही इडी-सीबीआय भूमिगत आहेत”
“कर्नाटकातील भाजप आमदार मडल विरुपक्षप्पा यांच्या घरात आठ कोटी रुपये ‘रोख’ घबाड सापडले. हे इतके मोठे ‘कॅशकांड’ होऊनही ईडी, सीबीआय भूमिगत आहेत. मोदी हे भ्रष्टाचारमुक्त शासनाच्या वल्गना करतात. सगळ्यात भ्रष्ट शासन व्यवस्था त्यांचीच आहे. याच आमदार मडल यांच्या चिरंजीवांना लाखोंची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली, पण त्यावर भाजपवाले बोलायला तयार नाहीत”, असाही आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.