सध्या दिल्लीत संसदीय अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच संपलेल्या पहिल्या सत्रामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची भाषणं झाली. त्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं दिसून आलं. राहुल गांधींनी संसदेत काही फोटो दाखवल्यामुळे आणि त्यांच्या भाषणातील काही भाग वगळल्यामुळे मोठा गदारोळ झाला. या अधिवेशनात पंतप्रधान मोदींपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपर्यंत सगळ्यांनी १९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख केला. तो इतिहासातला काळा डाग असल्याचं म्हटलं. यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. यासंदर्भात ठाकरे गटानं पंतप्रधान मोदींवर आगपाखड केली आहे.

‘याला विकास मानत असाल तर देशाला फसवत आहात’

‘देशातील ८० कोटी लोकांना महिन्याला माणशी पाचेक किलो धान्य फुकटात देणे याला मोदी विकास मानत असतील तर ते देशाला फसवत आहेत. राज्यसभेतील एक सदस्य मनोज झा यांनी सांगितले, “ग्रामीण भागात आता मजूर मिळत नाहीत. लोकांना घरबसल्या फुकट धान्य मिळते. त्यामुळे लोक आळशी होत आहेत. मजूर मिळत नसल्याने कामे रखडली आहेत.” मोदी व त्यांच्या सरकारने गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली कोट्यवधी लोकांना घरबसे व आळशी केले’, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून मोदींवर टीका करण्यात आली आहे.

अजित पवार व अशोक चव्हाणांचा केला उल्लेख

“मागच्या दहा वर्षांत ईडी, सीबीआयने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच धाडी घातल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांना अटका केल्या. यापैकी काही प्रमुख ‘आरोपी’ भाजपात गेले तेव्हा त्यांना अभय मिळाले व कारवाया थांबल्या, हे खरे नाही काय? अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर हल्ला करणारे हेच मोदी होते. हे दोन्ही नेते आज मोदी यांच्या मांडीवर बसले आहेत. असे असंख्य भ्रष्टाचारी मोदी यांच्या तंबूत आज आनंदात नांदत आहेत. तरीही मोदी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असे सांगतात. इतक्या धीटपणे खोटे फक्त मोदीच बोलू शकतात”, असं म्हणत ठाकरे गटानं अजित पवार व अशोक चव्हाण यांनाही लक्ष्य केलं आहे.

‘…तर अदानी, अंबानींची चौकशी का नाही?’

“निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले की, अंबानी व अदानी हे काँग्रेसला टेम्पो भरून पैसे देतात. पंतप्रधानांनी हे सांगितले म्हणजे खरेच असणार. मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सने अदानी, अंबानी यांना चौकशीसाठी बोलावले काय? निदान मोदी यांना तरी बोलवा”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक

‘मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे. १९७५ साली विरोधी नेत्यांनी सैनिकांना सरकारविरुद्ध बंड करण्याची चिथावणी दिली हे मोदींना मान्य आहे काय? मोदींना त्यांच्याविरुद्ध काढलेले व्यंगचित्र सहन होत नाही. व्यंगचित्रकारांवर ते देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतात. इथे तर देशाच्या सैन्यालाच देशविरोधी पृतीचे आवाहन केले गेले होते. हे सर्व घडवले जात असताना इंदिरा गांधी यांनी काय करायला हवे होते, असा मोदींचा सल्ला आहे?’ असा सवालही ठाकरे गटानं केला आहे.