अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं असून दोन्ही गटांना नवीन नावं आणि चिन्हं दिली आहेत. यादरम्यान ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून काही गंभीर आरोप केले आहेत. आमची रणनीती तुम्ही उघड केली असा आरोप ठाकरे गटाने केला असून, निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांचं पत्र लिहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलं असून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचं वाटप केलं आहे. तसंच आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या पक्षनावांचे वाटप केलं आहे.

ठाकरे गटाचा आरोप काय?

नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून यामध्ये १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. पत्रातून आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवलं आहे.

“शिंदे गटाला जे हवं, तेच त्यांना कसं मिळतं?” निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर अनिल देसाईंचा सवाल

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ असे पर्याय दिले होते. शिंदे गटानेही दिलेल्या पर्यायांमध्ये पहिल्या दोन चिन्हांचा समावेश होता. याशिवाय पक्षाच्या नावासाठी दिलेल्या पर्यायांमध्येही साधर्म्य होते. दोन्ही गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ पर्याय दिला होता.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले होतं. याआधी शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ ही तीन पर्यायी चिन्हे आयोगाकडे सादर केली होती. ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह खुल्या यादीत नव्हते, ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ या चिन्हांना धार्मिक संदर्भ होता. शिवाय, ‘त्रिशूळ’ या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटानेही दिला होता. त्यामुळे शिंदे गटाने दिलेले तीनही पर्याय आयोगाने फेटाळले आणि मंगळवारी नवे तीन पर्याय देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, दिलेल्या चिन्हांमधून आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचे वाटप केलं आहे.

शिंदे गटाकडून प्रतिक्रिया

शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की “त्यांच्या बाजूने निर्णय लागला की सगळ्या यंत्रणा योग्य आणि विरोधात गेला की आमची माहिती दुसऱ्यांना दिली अशी आरडाओरड करतात. यामध्ये काही तथ्य नाही. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. घटनेने, कायद्याने त्यांना अधिकार दिले असून, त्या कक्षेतच राहून ते काम करत असतात. ते अशाप्रकारे माहिती उघड करणार नाहीत”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray letter to election commission allegations of favouring shinde faction sgy