गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार आणि भारतीय राजकीय वर्तुळ या दोन्ही ठिकाणी गौतम अदाणी आणि हिंडेनबर्गचा अहवाल या दोन गोष्टींची जोरदार चर्चा चालू आहे. अदाणींनी शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याचा गंभीर ठपका हिंडेनबर्गच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. यानंतर अदाणी समूहाचे शेअर्स पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्येही अदाणी समूहाची पत ढासळू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय आर्थिक वर्तुळावर ओढवलेलं हे संकट गंभीर होत असताना त्यावरून ठाकरे गटानं नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सर्व प्रकरणावर मोदी अद्याप मौन का आहेत? असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“माजी पंतप्रधानांना मौनीबाबा म्हणणाऱ्यांकडून..”
अदाणी प्रकरणावरून टीका करताना सामनातील अग्रलेखामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण करून देण्यात आली आहे. “अदानी यांच्यामुळे एलआयसी व भारतीय स्टेट बँकेचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी मागणी विरोधक करीत आहेत, पण पंतप्रधान मौन बाळगून आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चेष्टा ‘मौनीबाबा’ म्हणून करणाऱयांकडून असे मौन बाळगणे जरा रहस्यमय आहे”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.
“अदानी प्रकरणात पंतप्रधानांनी ‘मन की बात’ व्यक्त करावी, निदान ‘मन की भडास’ व्यक्त करून विरोधकांवर हल्ला करावा, तर तेदेखील नाही. मग सरकार काय करते आहे? सरकार याप्रश्नी विरोधकांत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे”, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं, दिलं आणखी एक खुलं आव्हान; म्हणाले, “मी तुमच्यासमोर…”
“फुग्यात हवा भरण्याचे राष्ट्रीय कार्य”
दरम्यान, भाजपाकडून अदाणींना पाठबळ दिलं जात असल्याचा दावा पुन्हा एकदा ठाकरे गटानं केला आहे. “या फुग्यास (अदाणी) सर्वात प्रथम टाचणी लावली ती राहुल गांधी यांनी. राहुल गांधी यांनी संसदेत व बाहेर अदानी-मोदी संबंधांवर अनेकदा हल्ला केला. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान अर्थतज्ञ रघुरामन राजन श्री. गांधी यांच्याबरोबर चालले. त्या वेळी झालेल्या चर्चेत गांधी म्हणाले,‘अदानी हा एक फुगा असून तो लवकरच फुटेल.’ आता फुगा फुटला आहे व त्या फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचे राष्ट्रीय कार्य नव्याने सुरू आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“अदानी यांच्या आर्थिक साम्राज्यात भाजपने हवा भरली. यात राष्ट्रवाद, हिंदुत्वाचा वगैरे प्रश्न येतोच कुठे? पण संघास असे वाटते की, अदानींचा फुगा फोडण्यामागे आंतरराष्ट्रीय तसेच देशद्रोही शक्ती आहेत. हा तर्क तर मजेदार आहे. ज्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांनी अदानी प्रकरणावर परखड भाष्य केले, त्या सगळय़ांना परकीय हस्तक किंवा देशद्रोही ठरवण्यात येत आहे”, अशा शब्दांत अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्र सोडण्यात आलं आहे.