उन्नाव येथे जमिनीखाली एक हजार टन सोने दडले असल्याचे साधू शोभन सरकार यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याची तयारी सुरू असतानाच आता याच शोभन यांना आणखी दोन ठिकाणी सोने दडले असल्याचा साक्षात्कार झाला आहे. आता यावेळी सोन्याचे वजन चार हजार टन एवढे आहे!
शोभन सरकार यांना आदमपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फतहपूर किल्ल्यात अडीच हजार टन तर कानपूरनगर परिसरात दीड हजार टन सोने दडले असल्याचा साक्षात्कार झाला आहे. शोभन यांचे स्वप्न साकारण्यासाठी तत्पर असलेले केंद्रीय राज्यमंत्री चरणदास महंत यांनी आता या सोन्याच्या शोधासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत यासाठी पत्रप्रपंच केला आहे.
केंद्राला लिहिलेल्या पत्रात महंत यांनी या सोन्याचा उल्लेख केला असून संबंधित ठिकाणी रिझव्‍‌र्ह बँक, पुरातत्त्व विभाग, भूसर्वेक्षण विभाग यांच्या पथकांबरोबरच खजिना वाहून नेण्यासाठी वायूदलाची दोन खास विमानेही तैनात करण्याची विनंती त्यांनी केली आहे.