32 Year Old Women Suicide Due To Trolling: राजकीय मुद्द्यांवरून सोशल मीडियावर होणारा वाद काही नवीन विषय नाही. अनेकदा यामुळेच कित्येक कौटुंबिक ग्रुप, कार्यालयीन चर्चा किंवा अगदी मजा-मस्तीसाठी बनवलेल्या ऑनलाईन ग्रुप्सवर सुद्धा राजकीय पोस्ट टाकायच्या नाहीत अशी तंबी दिलेली असते. मागील काही वर्षांत सोशल मीडिया हा राजकीय प्रचाराचा इतका महत्त्वाचा भाग झाला आहे की, कुण्या एका सामान्य माणसाने जरी एखादी सामान्य प्रतिक्रिया आपल्याच सोशल मीडियावर दिली असेल तरी त्यावर सुद्धा समर्थक विरुद्ध विरोधक असा वाद पेटतो. एखाद्या मोठ्या गटाला न आवडणाऱ्या पक्षाला जर कुणी पाठिंबा देत असेल तर अत्यंत घाणेरड्या भाषेत ट्रोलिंगला सामोरे जावं लागतं असं काहीसं सध्या समीकरण झालं आहे. हेच समीकरण सध्या एका महिलेच्या जीवावर बेतल्याचे वृत्त समोर येत आहे. विशेष म्हणजे यावरून सध्या सोशल मीडियावरच हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आंध्रप्रदेशमधील ३२ वर्षीय महिलेने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून मागील आठवड्यात आत्महत्या केल्याचे समजतेय. आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष YSR काँग्रेसने असा दावा केला आहे की, सदर महिलेने एका व्हिडिओमध्ये वाय एस आर काँग्रेसला समर्थन दिल्यावर तेलगू देसम पक्ष आणि जना सेना पक्षाच्या मीडिया विभागाकडून या महिलेला प्रचंड ट्रोल करण्यात आले परिणामी तिने कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडला आहे.

लोकांनी ट्रोल केलं, ‘तो’ Video नेमका काय होता?

YSR काँग्रेसतर्फे ४ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सदर महिला गोठी गीतांजली देवी यांनी आंध्र प्रदेश सरकारच्या जगन्ना गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्लॉट प्राप्त झाल्याचे म्हटले होते. याचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता, गीतांजली देवी त्यात म्हणाल्या होत्या की, “माझं स्वप्न आज सत्यात उतरलं आहे, मला माझ्या घरासाठी स्वतःच्या नावे जागा मिळाली आहे, हा सन्मान व्यासपीठावर सगळ्यांसमोर होईल असे अपेक्षित नव्हते त्यामुळे आणखीनच आनंद होत आहे.”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याखाली अनेक अकाउंट्सवरून अपमानास्पद कमेंट्स करण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या हवाल्याने एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तानुसार, याच ऑनलाईन जाचाला कंटाळून त्या व्यथित होत्या शेवटी शेवटी ७ मार्चला तेनाली रेल्वे स्टेशनवर जन्मभूमी एक्सस्प्रेससमोर उडी मारून त्यांनी जीव दिला. त्यांना गुंटूरच्या रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा अंत झाला. गीतांजली यांना दोन शाळेत जाणाऱ्या मुली आहेत.

‘स्टार कॅम्पेनर ऑफ द डे’

गीतांजली यांचा एक व्हिडीओ YSR काँग्रेसतर्फे ‘स्टार कॅम्पेनर ऑफ द डे’ अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता त्यात त्या म्हणतात की, “त्यांनी (YSR) आमची स्वप्ने पूर्ण केली आहेत. मी प्लॉटसाठी पैसे दिलेले नाहीत. मला अम्मा वोदी योजनेतून माझ्या सासऱ्यांसाठी पेन्शन, माझ्या सासूसाठी ‘YSR Cheyutha’ द्वारे आर्थिक मदत आणि आता आमच्या स्वप्नातील घर असे फायदे मिळाले आहेत. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांना विजयी करण्यासाठी मी मतदान करणार आहे”. या व्हिडिओवर लोकांनी कमेंट करताना गीतांजली यांनी पैसे घेऊन पक्षाच्या प्रचारासाठी असा व्हिडीओ केल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा<< Video: रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांना लाथ मारून हाकललं; पोलीस अधिकारी निलंबित, नागरिकांचं म्हणणं काय?

सध्या, याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर प्रकरणावर आंध्र प्रदेश महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा वासवी पद्मा यांनी सांगितले की, ज्या सोशल मीडिया हँडलने तिला टार्गेट केले त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking 32 year old women jumps in front of train after getting trolled for supporting ysr congress accusations abuse led to death svs
Show comments