भेसळयुक्त रक्त तयार करुन ते रुग्णांना विकणाऱ्या टोळीला उत्तर प्रदेश पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या टोळीने आजवर एक हजाराहून अधिक रुग्णांना हे बनावट रक्त विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसटीएफच्या पथकाने हा कारवाई करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पैसा कमावण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या टोळीसोबत लखनऊ शहरातील अनेक मोठ्या रक्त पेढ्यांचा आणि प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघड झाला आहे. महत्वपूर्ण पुरावे मिळाल्यानंतर एसटीएफ आणि एफएसडीएने रक्त पेढ्यांविरोधात तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
एसटीएफचे वरिष्ठ अधिकारी अभिेषक कुमार सिंह यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी पोलिसांना शहरात भेसळयुक्त रक्त तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर रक्त विकणाऱ्या अनेक लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, ही माहिती उघड झाली की लखनऊमधील त्रिवेणीनगर येथील एका घरात हे भेसळयुक्त रक्त बनवण्याचा गोरखधंदा सुरु आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री पोलिसांनी या टोळीचा सुत्रधार मोहम्मद नसीम याच्यासह राघवेंद्र सिंह, रशीद अली, पंकज कुमार त्रिपाठी यांना ताब्यात घेतले.
यांतील राघवेंद्र सिंह हा एका रक्त पेढीमध्ये लॅब टेक्निशिअन आहे. तर पंकज त्रिपाठी लॅब असिस्टंट असल्याचे समोर आले आहे. हे दोघेही नसीमच्या घरी जाऊन रक्तदात्यांकडून रक्त गोळा करायचे. यासाठी रशिद अली पैशांचे आमिष दाखवत रिक्षा चालक आणि नशा करणाऱ्यांना स्वतःचे रक्त विकण्यासाठी घेऊन यायचा. यामध्ये भेसळयुक्त रक्तासाठी सर्टिफाइड रॅपर, बॅगा आणि इतर कागदाची सोय करण्याची जबाबदारी हनी निगम याच्यावर होती.
ही टोळी एक युनिट रक्ताच्या नमुन्यामध्ये सलाईन वॉटर मिसळून दोन युनिट रक्त तयार करीत होती. या रक्ताला पॅक्ड रेड ब्लड सेल्स (पीआरबीसी) म्हणून विकले जात होते. यासाठी सर्टिफाइड रक्त पेढ्यांचे रॅपर आणि बॅगांचा वापर करण्यात येत होता. हे लोक एक युनिट रक्ताच्या बदल्यात रक्तदात्यांना ५०० ते १००० रुपये देत होते. त्यानंतर या रक्तात भेसळ करुन ते २ हजार ते ४ हजार रुपयांना विकले जात होते. हे भेसळयुक्त रक्त रुग्णाला चढवल्यास काही वेळात त्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. इतकेच नव्हे रक्तदात्यांकडून घेतलेल्या रक्ताची चाचणी केलेली नसल्याने एचआयव्ही, हेपॅटायटिस सारखे गंभीर आजार होऊ शकतात, तपासातून समोर आले आहे.